पोलीस अधिक्षक एस. जयकुमार यांच्यानंतर म्हणजेच 2015 पासून आज पावेतो जळगाव जिल्ह्याला सरळ भारतीय पोलीस सेवेतील पोलीस अधीक्षक लाभलेले नाहीत. आता मात्र प्रवीण मुंडे यांच्या रूपाने ते जळगाव जिल्ह्याला मिळाले आहेत. दरम्यान डॉक्टर जालींदर सुपेकर, दत्तात्रय कराळे, दत्ता शिंदे आणि पंजाबराव उगले यांच्या कार्यकाळात जनमानसामध्ये स्थान निर्माण करून पोलीस दलाची प्रतिमा एकही पोलीस अधीक्षक उजळू शकले नाहीत. हे दुर्दैवाने म्हणावे लागेल जालींदर सुपेकर यांच्या कार्यकाळात पोलीस निरीक्षक अशोक सादरे आत्महत्या प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रभर गाजले. त्यामुळे जळगाव पोलीस दलाची वेशीवर टांगलेली अब्रुची लक्तरे उभ्या महाराष्ट्राने पाहिली. त्यानंतर दत्तात्रय कराळे यांच्या कार्यकाळात पोलीस कॉन्स्टेबल सुशील मगरे याचा थेट दरोडया मध्ये सहभाग आढळून आला. त्यामुळे पोलिस खात्याची दरोडेखोर अशी प्रतिमा जळगाव जिल्हा पोलीस दलाची झाली. परंतु दत्तात्रय कराळे यांनी सुशील मगरेला कठोर भूमिका घेऊन खात्यातून थेट बडतर्फ केले. त्यांना जेमतेम पंधरा महिन्याचा कार्यकाळ लाभला.
त्यानंतर दत्ता शिंदे यांनी आपल्या पोलिसांच्या शिस्तीच्या बाबतीत अत्यंत कडक भूमिका घेऊन पोलीस मुख्यालयाच्या आवारात सुद्धा पोलीस कर्मचार्यांना त्यांनी हेल्मेट सक्तीचे केले होते. परंतु नागरिकांना मात्र शिस्त लावण्यात ते सपशेल अपयशी ठरले. त्याचबरोबर त्यांचे कार्यालयात सकाळच्या तीन वाजेपर्यंत बसून राहणे, आपल्या हाताखालील अधिकारी कर्मचार्यांना तुच्छ वागणूक देणे, दुय्यम अधिकार्यांना प्रभारी अधिकारी म्हणून नेमणूक देणे, कर्मचार्यांच्या शारीरिक क्षमतेचा विचार न करता त्यांना मैदानावर एक्स्ट्रा ड्रिल देणे, या तणावामुळे पोलीस कर्मचारी शरद पाटील यांना मंगलम हॉल येथे हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन ते बालंबाल बचावले होते. त्याचबरोबर कर्मचार्यांचे काहीएक ऐकून न घेता एकतर्फी कारवाई करणे त्यांच्या वागणुकीमुळे जळगाव जिल्हा पोलिस दलातील अधिकारी कर्मचार्यांमध्ये मानसिक तणाव वाढला होता असे आजही काही कर्मचारी बोलतात. शेवटी त्यांच्या सहा महिन्यांच्या कार्यकाळात लूज सुपरव्हिजन मुळे त्यांची बदली करण्यात आली.
त्यानंतर पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले देखील आपल्या कर्तुत्वाची विशेष अशी छाप पाडू शकले नाही. कोरोना महामारी च्या कार्यकाळात तत्कालीन पोलीस निरीक्षक आणि चार कर्मचारी यांचा एका दारूच्या दुकानात थेट सहभाग आढळून आल्याने त्या अधिकारी-कर्मचार्यांना सुद्धा बडतर्फ केले आहे. तसेच उगले यांनी 19 महिन्याच्या कार्यकाळात पोलीस कर्मचारी, त्यांचे कुटुंबिय व पोलीस विभाग यांच्या हिताचा एकही निर्णय घेतलेला नाही उलट निलंबन व बडतर्फीच्या कारवायांमध्ये पक्षपातीपणा केल्याचे उघड झालेले आहे. अॅन्टीकरप्शनच्या कारवाईत एका प्रकणात बडतर्फीची व एकाची निलंबनाची कारवाई केली येथेच त्यांचा दुजाभाव उघड झाला. निंबोल येथील बँकेच्या मॅनेजरवर गोळीबार होवून खून झाला होता, त्यातील तपास अद्याप तो गुन्हा उघडकीस आलेला नाही. व भादली हत्याकांडांचा इतर पोलीस अधिक्षकां प्रमाणे यांनाही अद्याप यश आलेले नाही. कर्मचार्यांवर बडतर्फ व निलंबनाच्या कारवाईमुळे भितीचे वातावरण निर्माण झालेले आहे. दारु प्रकरणात बडतर्फीच्या कारवाईत वचवा काढल्याचे बोलले जात आहे हे खरे की खोटे हे उगलेंनाच माहिती?
आणि आता तरुण तडफदार सरळ भारतीय पोलिस सेवेतून उत्तीर्ण झालेले 2012 च्या बॅचचे प्रवीण मुंडे हे जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून लाभलेले आहेत प्रवीण मुंडे हे सर्वसामान्य कुटुंबातून आलेले असून एकंदरीत यांचा कार्यकाळ पाहता अत्यंत कर्तव्यकठोर आणि एक संवेदनशील पोलीस अधिकारी म्हणून त्यांची ओळख झालेली आहे स्वतः डॉक्टर असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नक्कीच जळगाव जिल्ह्याला त्यांचा फायदा होईल.
या अगोदर त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातदोन वर्ष पोलीस अधीक्षक म्हणून अत्यंत उत्कृष्ट पणे कार्यभार सांभाळलेला आहे. आमच्या काही रत्नागिरीतील मित्रांना आम्ही फोन करून प्रवीण मुंडे यांच्या बद्दल माहिती विचारली असता आम्हाला असे समजले की प्रवीण मुंडे हे जनतेच्या हृदयापासून ते सोशल मीडियाच्या डीपी पर्यंत त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये स्थान मिळवलेले आहे.
एक विद्वान, तरुण,धाडसी, कर्तव्यदक्ष आणि सदैव हसतमुख अधिकारी म्हणून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सर्वसामान्यांना त्यांची ओळख झालेली आहे. शक्तीचा सुयोग्य वापर करून मुंडेंनी आपल्या रत्नागिरीतील कारकिर्दीत उल्लेखनीय अशी कामगिरी केलेली आहे सामाजिक संघटनांची मोट बांधून कठीण प्रसंगात हजारो कुटुंबांना आधार दिलेला आहे. आपलं कार्यक्षेत्र सोडाच पण त्यापलीकडे देखील आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून समाजासाठी उठावदार काम केलें.नेहमी त्यांची कार्यवाही पूर्ण स्पष्ट असायची त्यामुळे पत्रकार परिषदेत कधी माहिती देताना त्यांचा कधी गोंधळ झालेला नाही. माणसं जोडण्याचं कसब मुंडेंच्या अंगी आहे. त्यांनी रत्नागिरीमध्ये मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करून पोलीस आणि समाजामधील जी दरी होती कमी करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. मुंडेंची कारकीर्द ज्या विषयाला स्पर्श करून गेली तिथे सोन्याची पुढारी निर्माण केली. मुंडेंच्या जनताभिमुख कारकिर्दीचे हे रंग आम्हाला रत्नागिरीच्या अनेक मित्रांनी आम्हाला सांगितली आणि म्हणूनच आम्ही आजचा विशेष संपादकीय लेख नूतन पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे यांच्या बद्दल लिहित आहोत बघूया जळगाव जिल्ह्यातील राजकारण तसेच भुसावळ शहरासारखी भारतातील जंक्शन रेल्वे स्टेशनच्या माध्यमातून वाढलेली गुन्हेगारी पोलिसांच्या अडीअडचणी समजून घेऊन ते कशा पद्धतीने काम करतात आणि येणार्या आव्हानांना कसे सामोरे जातात तो येणारा काळच सांगेल.
साप्ताहिक केसरी राज तर्फे नूतन पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे यांना खूप खूप शुभेच्छा!

भगवानसोनार
संपादक, केसरीराज







