ग्रामस्थांनी मानले एसटी महामंडळाचे आभार
रावेर (प्रतिनिधी) : रावेर तालुक्यातील पुरी गोलवाडे, रेंभोटा येथून सुमारे १५ वर्षांनी पुन्हा बस सेवा सुरू झाली असून गावातील जनतेत आनंदाचे वातावरण दिसून आले आहे. ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ या ब्रिद वाक्याचे सार्थक झाले असल्याने, महिला व शालेय विद्यार्थ्यांनी आभार मानले आहेत.
या आधी रावेर-जळगांव मुक्कामी बस सेवा सुरू होती. पण रस्त्याच्या बिकट अवस्थेमुळे बस सेवा खंडित करण्यात आली होती. त्यामुळे गावातील लोकांना तसेच विद्यार्थांना सुमारे १ ते दीड किलोमिटर पायी जावे लागत असे. तसेच गावातून रावेर किंवा फैजपूर, सावदा जायचे असल्यास गावापासून १ किलोमिटरवर असलेल्या फाट्यापर्यंत पायी जावे लागत असे. आता शिंगाडी, रेंभोटा, पुरी गोलवाडा बस सेवा सुरू झाल्याने ग्रामस्थांसह विद्यार्थांच्या अडचणी कमी झाल्या असून सर्व गावात आनंदाचे वातावरण दिसून आले आहे .
या प्रसंगी गावात तब्बल १५ वर्षांनी प्रथमच बस गावात आली म्हणून नागरिकांनी एस.टी. बसची पूजा करून बस ड्रायव्हर आणि कंडक्टर याची शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले. त्या प्रसंगी गावातील सरपंच, ग्रामसेवक, पोलिस पाटील, ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील विद्यार्थी तसेच सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.