कार्यकर्त्यांकडून मतदारांना प्रत्यक्ष ‘डेमो’द्वारे मार्गदर्शन
जळगाव ( प्रतिनिधी ) – महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग १२ ‘अ’ मधील राजकीय वातावरण चांगलेच सक्रिय झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार ललितकुमार घोगले यांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांनी आता कंबर कसली आहे. मंगळवारी कार्यकर्त्यांनी प्रभागात घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधला आणि ललितकुमार घोगले यांच्या समर्थनात जोरदार प्रचार केला.

निवडणुकीला काहीच तास उरले असताना, ललितकुमार घोगले यांच्या समर्थकांनी मंगळवारी सकाळपासूनच प्रभागात वैयक्तिक भेटीगाठींवर भर दिला. “आपला माणूस, आपल्या विकासासाठी” असा नारा देत कार्यकर्त्यांनी मतदारांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या आणि उमेदवाराची भूमिका मांडली.
प्रचारादरम्यान कार्यकर्त्यांनी एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला. अनेकदा मतदानाच्या दिवशी मतदारांमध्ये गोंधळ होऊ नये, यासाठी कार्यकर्त्यांनी मतदारांना ‘मतदान कसे करावे’ याबाबतचा प्रत्यक्ष डेमो दाखवला.
ईव्हीएम मशीनवर उमेदवाराचे नाव आणि तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह किती क्रमांकावर आहे, बटन कसे दाबायचे आणि व्हीव्हीपॅट पावती कशी तपासायची, याची सविस्तर माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी बोलताना कार्यकर्ते म्हणाले की, “ललितकुमार घोगले यांनी नेहमीच जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली आहे. प्रभागातील मूलभूत समस्या सोडवण्यासाठी ते सक्षम असून, मतदारांचा त्यांना मोठा पाठिंबा मिळत आहे.” घरोघरी सुरू असलेल्या या प्रचार मोहिमेमुळे प्रभागात सध्या ‘तुतारी’चा आवाज घुमत असून, या उपक्रमाचे मतदारांकडूनही कौतुक होत आहे.









