जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील प्रकरण
जळगाव (प्रतिनिधी) : नवीन पोल टाकणे व त्यावरून वीजपुरवठा सुरू करण्यासाठी लाच घेतल्याच्या प्रकरणात महावितरणचा दुसरा वरिष्ठ तंत्रज्ञ श्रीकांत कोमलसिंग पाटील (वय ३८, रा. गजानन कॉलनी, निमखेडी शिवार, जळगाव) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.
तक्रारदार यांच्या घराचे शिरसोली येथील बांधकाम साइटचे काम पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी नवीन पोल टाकण्यात आले होते. या पोलवरून वीज कनेक्शन सुरू करण्यासाठी तक्रारदार हे महावितरणच्या शिरसोली कार्यालयात वेळोवेळी गेले असता, या कामासाठी ३० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्यापैकी १० हजार रुपये या अगोदर घेतले होते. तरीदेखील वीज कनेक्शन सुरू करून दिले नव्हते. त्यासाठी उर्वरित २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना वरिष्ठ तंत्रज्ञ विक्रांत भरत पाटील (वय ३७, रा. माऊली नगर) याला जळगावात अटक झाली होती.
या प्रकरणात श्रीकांत याचाही सहभाग निष्पन्न झाल्याने त्याला अटक केली. तपासाधिकारी योगेश ठाकूर यांनी संशयिताला मंगळवारी न्या. एस. आर. झंवर यांच्या न्यायालयात हजर केले असता, एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.