चाळीसगाव तालुक्यातील तळेगाव येथील घटना
चाळीसगाव (प्रतिनिधी) : कुटुंब गच्चीवर झोपल्याचा फायदा घेऊन चोरट्यांनी घरात घुसून रोकडसह सोन्याचे दागिने असा सुमारे ७४ हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केल्याची घटना तालुक्यातील तळेगाव येथे घडली. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उद्धव अर्जुन शिंगाडे (रा. तळेगाव) हे दि. २७ रोजी रात्री ८ वाजता जेवण करून कुटुंबासह गच्चीवर झोपण्यास गेले. त्यांचे आई-वडील घराबाहेर अंगणात झोपलेले होते. शिंगाडे हे मध्यरात्री २ वाजता चार्जिंगसाठी लावलेला मोबाइल घेण्यास गच्चीवरून घरात आले असता त्यांना घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. तसेच किचनमधील दरवाजाची कडी तुटलेली दिसली. घरातील बेडरूममध्ये जावून पाहिले असता लोखंडी कपाटातील सामान अस्ताव्यस्त पडलेले होते. कपाटाच्या लॉकरमधील स्टीलच्या डब्यात ठेवलेले ३४ हजार रुपये किमतीची १० ग्रॅम वजनाची मणी असलेली सोन्याची पोत व रोख ४० हजार रुपये असा सुमारे ७४ हजार रुपयांचा ऐवज दिसून आला नाही.
अज्ञात चोरट्याने किचनमधील दरवाजाची कडी तोडून आत प्रवेश केला व बेडरूममधील लोखंडी कपाटात ठेवलेला ७४ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेल्याचे स्पष्ट झाले. हा प्रकार दि. २७ रोजी रात्री ११:३० ते २८ रोजी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास घडला. याप्रकरणी उद्धव शिंगाडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याच्या विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार राजेश रावते हे करीत आहेत.