जास्त मोबदला मिळण्याचे आमिष दाखवीत कोटीची फसवणूक
जळगाव शहरातील आव्हाणे शिवारातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) – बांधकाम व्यावसायिकाला तब्बल १ कोटी रुपयांचा चुना लावल्याची धक्कादायक घटना जळगाव शहरातील आव्हाणे शिवारात घडली आहे. याप्रकरणी ३१ ऑगस्ट रोजी रात्री दोन जणांवर जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
आव्हाणे शिवारात भाऊसाहेब भाऊराव पाटील (वय ५२) हे वास्तव्यास आहेत. ते कन्स्ट्रक्शन व्यावसायिक आहेत. जळगावातील विवेकानंद नगरातील नंदु सुदाम बोरसे व दिपक सुदाम बोरसे या दोन्ही भावंडांनी भाऊसाहेब पाटील यांची भेट घेतली. खोट्या व बनावट फर्मची कागदपत्रे दाखवून भाऊसाहेब पाटील यांचा विश्वास संपादन केला. जास्त रकमेचा मोबदला मिळेल म्हणून दोघांनी भाऊसाहेब पाटील यांच्याकडून ९ मार्च २०२३ ते १८ जुलै २०२३ या काळात तब्बल वेळोवेळी १ कोटी रुपये घेतले. दरम्यान सदर कागदपत्र आणि फर्म ही खोटी असल्याचे समोर आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याची भाऊसाहेब पाटील यांना खात्री झाली. त्यांना पैसे परत मिळावे म्हणून मागणी केली, मात्र संबंधित दोघा भावंडांनी रक्कम परत केली नाही.
शेवटी याप्रकरणी भाऊसाहेब पाटील यांनी गुरुवारी रात्री जळगाव तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरुन नंदु सुदाम बोरसे व दिपक सुदाम बोरसे दोन्ही रा. विवेकानंद नगर, जळगाव ह.मु भुज कच्छ, गुजरात या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक अनंत अहिरे हे करीत आहेत.