शासकीय रुग्णालयात उपचार सुरु
जळगाव (प्रतिनिधी) :- जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आदिवासी कोळी समाज समन्वय समितीतर्फे विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरु आहे. आज १८ व्या दिवशी दोन महिला उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली असून त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, कोळी समाजातर्फे आकाशवाणी चौकात रास्ता रोको करण्यात आला.
पूजा प्रमोद कोळी (वय ४८, रा. योगेंद्र नगर, बुलढाणा जि. बुलढाणा) व सुनीता बाळू तायडे (वय ५०, रा. घाटे ता. रावेर) असे उपचारासाठी दाखल उपोषणकर्त्यांची नाव आहे. कोळी समाजाच्या मागण्यांबाबत जोवर शासनाकडून लेखी आश्वासन मिळत नाही, तोवर उपोषण सोडणार नाही, असा पवित्रा समाजबांधवांनी घेतला आहे. उपोषण सुरु झाल्यावर काही दिवसांनी प्रकृती खराब झाल्याने उपोषणस्थळीच त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते. काल गुरुवारी उपोषणाच्या १७ व्या दिवशी नितीन सपकाळे या तरुणाची प्रकृती खालावली होती.
त्याला प्रकृती स्थिर झाल्यावर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. त्यानंतर शुक्रवारी २७ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दोघे उपोषणार्थी महिलांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरु असून अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. दरम्यान, उपोषणार्थींची प्रकृती खालावत असल्याने कोळी समाजाची संतप्त प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे.