जळगाव (प्रतिनिधी) – भारत युवकांचा देश. देशाच्या विकासात असो किंवा देशावर आलेल्या आपत्ती विरुद्ध च्या लढ्यात भारताचे युवा नेहमी त्यांचे महत्वपूर्ण योगदान देतात. कोरोना आपत्तीतही जळगावची युवाशक्ती फाऊंडेशन सर्वांच्या मदतीला धावून जात आहे. शासनाच्या विविध उपक्रमांत ही संघटना शासनाची मदत करतेय. जळगावात युवाशक्ती फाउंडेशनमुळे आज अनेकांना वेळेवर मदत मिळाली आहे.
युवाशक्ती फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विराज कावडीया नेहमी त्यांच्या ‘युवाशक्ती’ च्या जोरावर जळगावच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करतात. कोरोना महामारी विरुद्धच्या लढ्यात ही फाउंडेशन “फ्रंट एंड” वर काम करत आहे. एप्रिल महिन्यात कोरोनाचा जेव्हा प्रसार व्हायला सुरुवात झाली तेव्हा फाऊंडेशनने घरोघरी जात प्रत्येकाची स्क्रिनिंग तसेच आर्सेनिक अल्बम – ३० गोळ्या वाटपाचे काम केले. लॉकडाऊन अचानक घोषित झाल्याने लोक जागोजागी अडकले होते. तेव्हा स्थलांतरितांसाठी ई – पास काढणे आवश्यक झाले होते. ई – पास काढणे प्रत्येकाला न जमणारे होते. तेव्हा हजारो प्रवाशांना आपल्या निश्चित ठिकाणी पोहोचण्यासाठी विराज कावडीया यांनी पासेस काढून दिल्यात.
लॉकडाऊन काळात पायी घरी जाणाऱ्या मजूरांचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. अशातच औरंगाबादहून एक व्यक्ती छिंदवाडा पायी जाण्यासाठी निघाली होती. ती जेव्हा जळगावात पोहोचली तेव्हा ही गोष्ट जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांना कळाली व त्यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे युवाशक्ती फाऊंडेशनने त्या व्यक्तीला शोधत त्यांच्या निवासाची सोय करत नंतर बसने पुढे जाण्याचीही सोय केली.
लॉकडाऊन काळातही युवाशक्ती नेहमी तत्पर होती. कुणाला काही अत्यावश्यक वस्तू हवी असल्यास ती घरपोच मिळवण्यासाठी त्यांनी हेल्पलाईन नंबर दिला होता. तसेच रुग्णांना पोहोचविण्यासाठी रिक्षाची व्यवस्था केली होती. शासनाकडून नव्याने सुरू करण्यात आलेल्या ‘ माझे कुटुंब माझी जबाबदारी ‘ या उपक्रमात स्मार्ट हेल्मेटने तपासणी करण्याची जबाबदारी युवाशक्ती पार पाडत आहे. या मदतीसाठी विराज यांचा वेळोवेळी सन्मान ही केला जातो. परंतु ” सन्मान मिळण्यापेक्षा जेव्हा गरजूंची मदत करतो तेव्हा जास्त आनंद होतो. आम्ही मुळात फाउंडेशनची स्थापना गरजूंच्या अडचणी आमच्या युवाशक्तीच्या जोरावर सोडविण्यासाठी केली आहे असे ते सांगतात. कोरोना मध्ये मदत करणाऱ्या २७ सदस्यांना २-३ लाखांपर्यंतचा ९ महिन्यांचा इन्शुरन्स त्यांनी काढून दिलाय. तसेच होम क्वारंटाईन होणाऱ्या लोकांसाठी कागदपत्र पूर्ण करून देणे, शेजाऱ्यांचे ना हरकत प्रमाणपत्र तयार करणे अशी सर्व कामे त्यांच्यामार्फत होत आहेत.