मुक्ताईनगरात थरार : रात्री झोपेतच घातली डोक्यात कुऱ्हाड
मुक्ताईनगर (प्रतिनिधी) – कौटुंबिक वादातून पत्नी मोहरी निघून गेल्यानंतर पतीला आलेला राग त्याने थेट शालकाच्या डोक्यात कुऱ्हाड घालून शांत केला… मुक्ताईनगरातील या हत्येने खळबळ उडाली आहे. वाचा सविस्तर..
शहरातील भुसावळ रोडवर कोर्टाजवळ रहाणारा विशाल वामन ठोसरे या युवकाच्या बहिणीचे सुमारे चार वर्षांपूर्वी यावल तालुक्यातील चुंचाळे येथील विजय सावकारे याच्याशी लग्न झाले होते. पती पत्नीमध्ये कौटुंबिक वाद वाढले होते. मात्र, तथापि, अलीकडे दोघा कुटुंबामध्ये सलोखा निर्माण झाल्याची माहिती होती. मात्र, विजयच्या डोक्यात राग होताच…यात तो काल चुंचाळे येथे सासरवाडीला आला होता. येथे त्याने बराच गोंधळ घातला.
अन् पहाटे रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह
गोंधळ आटोपल्यानंतर विशाल ठोसरे हा आपल्या कुटुंबियांसोबत झोपला होता. पहाटे विशाल ठोसरे याच्या आईला जाग आली असता त्यांना आपल्या मुलाच्या डोक्यात कुर्हाडीचे घाव घातले असून यात त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे दिसले. त्यांनी घरातील इतर मंडळीला उठविले. विशाल ठोसरे यांचा मृत्यू झाल्याचे लक्षात आल्यानंतर कुटुंबियांनी प्रचंड आक्रोश केला. तर, विजय सावकारे हे घरात आढळून न आल्याने त्यांनीच हा खून केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
या खुनाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी रूग्णालयात पाठविण्यात आले आहे. शेवटचे वृत्त आले तोवर या प्रकरणी पोलीस स्थानकामध्ये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.