संशयास्पद मृत्यू प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल
जळगावातील एमआयडीसी परिसरात घडली घटना
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील एमआयडीसी परिसरातील गुरांचा बाजार येथे विदर्भ रोडलाईन्स कंपनीत तरुण ट्रक चालकाचा संशयास्पद मृतदेह आढळला होता. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला दाखल गुन्ह्यात मयत तरुणाच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीशी का बोलतो याचा राग येऊन बापानेच तरुणाला संपवल्याची घटना फिर्यादीतून उघड झाली आहे.
सागर रमेश पालवे (वय २५, रा. मालदाभाडी ता. जामनेर) असे मयत तरुणाचे नाव आहे. दुपारी त्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी तपास सुरू केला होता. त्यानुसार सागर पालवे हा विदर्भ रोडलाईन्स या ट्रान्सपोर्ट कंपनीत २ वर्षापासून कामाला होता. सागरच्या आई नीलम रमेश पालवे (वय ५५, रा. मालदाभाडी) यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे.
फिर्यादीत म्हटल्यानुसार घटना उघड झाली आहे. गुरुवारी ७ सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजता सागरने त्याच्या आईला फोन करून सांगितले की, त्याच्यासोबत काम करणारे निलेश गुळवे व पिंटू महाजन हे आराम कक्षामध्ये मला काठ्यांनी मारहाण करीत आहेत. तेव्हा आईने तुझा मालक विकास लगडे याला फोन करून सांग असे सांगितले. दुसऱ्या दिवशी सागरच्या आईने फोन केला असता त्याच्यासोबतचा चालक निलेश यांने फोन उचलला आणि सांगितले की, सागर झोपलेला आहे.
दुपारी १२ वाजेच्या सुमारास ट्रान्सपोर्ट कंपनीचे मालक विकास लगडे यांनी सागरच्या आईला फोन करून सांगितले की, तुमच्या मुलाला उलट्या होत आहे. लवकर जळगावला या. त्यानुसार फिर्यादी या नातेवाईकासोबत जळगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आल्या. तेथे त्यांना त्यांचा मुलगा मयत झाल्याचे समजले.
फिर्यादी नीलम पालवे यांना विकास लगडे यांच्याकडून समजले की, संशयित आरोपी पिंटू महाजन व निलेश गुळवे यांनी पिंटू महाजन यांच्या मुलीसोबत सागर का बोलतो याचा त्यांना राग होता. त्या रागातून त्यांनी कंपनीच्या कार्यालयात लाठ्या काठ्यांनी मारहाण करून त्यास जीवे ठार मारले आहे.
त्यावरून मयत सागर पालवे यांच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, डीवायएसपी संदीप गावित, पोलीस निरीक्षक जयपाल हिरे आदींनी भेट दिली. दरम्यान संशयीतांची धरपकड करण्याचे काम सुरू असून तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी करीत आहेत.