“दोषींना पकडले नाही तर नोकरीचा राजीनामा देईन” म्हणणाऱ्या एसपींनी शब्द पाळला

पोलिसांनी २४ तासात संशयितांना घेतले ताब्यात
शिंदखेडा ता.धुळे (प्रतिनिधी) – तालुक्यातील तरुणाचा अज्ञात मारेकर्यांनी धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना सोमवार दि. ६ सप्टेंबर रोजी दुपारी उघडकीस आली आहे. दरम्यान मारेकर्यांना अटक व्हावी यासाठी दरणे गावच्या ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन करीत आक्रमक झाले होते.
मारेकर्यांना पकडले नाही तर मी नोकरी सोडून देईन असे आश्वासन ग्रामस्थांना पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी दिले. पुढील काही तासातच रात्री खलाणे गावातील तीन संशयितांना या प्रकरणी ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता सदर गुन्हा त्यांनी केला असल्याची खात्री झाल्यानंतर रात्री उशिरापर्यंत त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली.
सोमवारी पोळा सण होता. पोळा सणाचे औचित्य साधून शोरुम मधून नवीन मोटरसायकल घरी आणत असतांना दुपारी ४ च्या सुमारास दरणे ते चिमठाणे दरम्यान रस्त्यामध्ये काही मारेकर्यांनी त्याला अडवून बेदम मारहाण केली. या धारदार शस्त्राने वार केले. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. तसेच मारेकर्यांनी त्याचा मोबाईल आणि दुचाकी घेऊन देखील पोबारा केला होता. शिंदखेडा तालुक्यातील दरणे येथील प्रेमसिंग राजेंद्र गिरासे असे तरूणाचे नाव आहे. घरातील कर्ता एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूची घटना समजताच सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
प्रेमसिंग गिरासे रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असल्याचे येणा-या जाणाऱ्या नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ जवळील चिमठाणे येथील रुग्णालयात दाखल केले.मात्र गंभीर दुखापत असल्याचे बघुन धुळे येथे जाण्याचा सल्ला दिला तेथून धुळे जात असतांनाच रस्त्या मध्येच प्रेमसिंग गिरासे याचा मृत्यू झाला.
मयत प्रेमसिंग गिरासे यांची हलाखीची परिस्थिती होती. तो घरातील एकुलता एक मुलगा असल्याने त्याच्यावर घराची संपूर्ण जबाबदारी होती. मारेकर्यांना लवकर अटक व्हावी यासाठी दरणे गावच्या ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले होते. परिस्थितीची जाणीव होताच पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित व अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जमावाला शांत करीत आरोपींना अटक केली नाही तर नोकरीचा राजीनामा देईल असे आश्वासन पोलीस अधीक्षक यांनी दिले. त्यामुळे ग्रामस्थ शांत झाले मात्र पोलिसांनी तपास कार्य वेगाने फिरवत खलाणे गावातील तीन संशयितांना ताब्यात घेतले. हे संशयित रस्ता थांबून लूट करणे असे गुन्हे करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली लागलीच त्यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला.







