जुने बस स्थानक परिसरात तणावाचे वातावरण
जळगाव (प्रतिनिधी) : शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. मंगळवार दिनांक २० रोजी संध्याकाळी ६.३० वाजेच्या सुमारास शहरातील जुने बसस्थानक परिसरात पूर्ववैमनस्यातून एकाने तिघांवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे.या हल्ल्यामध्ये एक तरुण जागीच मयत झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. यामुळे शहरात पुन्हा खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.
आकाश सुरेश सपकाळे (वय-३०) रा.कोळीपेठ, जैनाबाद जळगाव असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर त्याचा सख्खा भाऊ सागर सुरेश सपकाळे (वय २८) आणि सागर आनंदा कोळी (वय २२) दोन्ही रा. कोळी पेठ, जळगाव हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
जुन्या बस स्थानकाजवळ असलेल्या देशी दारूच्या दुकानाजवळ मंगळवारी संध्याकाळी आकाश सपकाळे, सागर सपकाळे आणि सागर कोळी हे उभे होते. त्या ठिकाणी अज्ञात आरोपींनी येऊन तिघांवर प्राणघातक शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये आकाश उर्फ धडकन याला छातीमध्ये घाव वर्मी लागल्याने तो जागीच मयत झाला तर सागर कोळी व सागर सपकाळे यांना उपचारार्थ नागरिकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले.
या ठिकाणी सागर सपकाळे याच्यावर प्रथमोपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी नातेवाईकांनी त्यास खाजगी दवाखान्यात दाखल केले आहे. तर सागर कोळी याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय ठाकुरवाड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजनराव पाटील यासह जिल्हापेठ व शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी घटनास्थळी आणि शासकीय रुग्णालयात भेट देऊन माहिती जाणून घेतली. जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांसह मित्रपरिवाराची प्रचंड गर्दी केली होती.