दुसरीकडे शेतकऱ्यांचे अतिपावसाने नुकसानदेखील झाल्याचे चित्र
जळगाव (विशेष प्रतिनिधी) : यंदा राज्यभरात जोरदार पाऊस झाला असून, खान्देशातील जळगाव, धुळे व नंदुरबार या तिन्ही जिल्ह्यांमध्ये सप्टेंबर महिन्यातच एकूण सरासरीहून अधिक पावसाची नोंद झाली आहे. तिन्ही जिल्ह्यांमध्ये १०० टक्क्यांहून अधिक पाऊस झाला आहे. त्यात परतीचा पाऊस अजून राहिला असल्याने, या सरासरीत मोठी वाढ होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
गेल्या वर्षी संपूर्ण राज्यातच सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला होता. त्यामुळे खान्देशातील मोठ्या जलप्रकल्पांमध्ये जलसाठाही जेमतेमच होता. मात्र, यंदा जोरदार पाऊस झाल्यामुळे खान्देशातील सर्वच लहान मोठी धरणं ९० टक्क्यांपर्यंत भरलेली आहेत. आगामी काही दिवसात हे जलसाठे १०० टक्क्यांपर्यंत भरण्याची शक्यता आहे.(केएएन) खान्देशात सर्वाधिक पाऊस नंदुरबार जिल्ह्यात झाला आहे. नंदुरबारमध्ये जून ते सप्टेंबर या चार महिन्यात ८६० मिमी पाऊस होतो. मात्र, यंदा, ११ सप्टेंबरपर्यंत ९२७ मिमी पाऊस म्हणजे सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.
तर जळगाव जिल्ह्यातदेखील सरासरीपेक्षा ४० मिमी पाऊस जादा झाला आहे. तर धुळे जिल्ह्यातही एकूण सरासरीचा ११४ टक्के पाऊस झालेला आहे. दुसरीकडे अति पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसान भरपाईची तसेच ओला दुष्काळ जाहीर करण्याची देखील मागणी काही शेतकऱ्यांकडून होत आहे.(केएएन) जळगाव शहराला पाणी पुरवठा करणारे वाघूर धरण सलग सहाव्या वर्षी १०० टक्के भरले आहे. हे धरण तयार झाल्यापासून दहाव्यांदा हे धरण शंभर टक्के भरले आहे. २०१९ ते २०२४ पर्यंत हे धरण सातत्याने १०० टक्के भरले आहे. विशेष म्हणजे गेल्यावर्षी राज्यासह जिल्ह्यात देखील सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला होता.
मात्र, त्यावेळीही हे धरण १०० टक्के भरले. धरणाने शंभरी गाठल्यामुळे जळगाव शहरासह जामनेरची देखील पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे.जिल्ह्यातील सिंचनासाठी महत्त्वाचे ठरणारे गिरणा धरण गुरुवारी १०० टक्के भरले होते. आता त्या पाठोपाठ वाघूर धरण देखील १०० टक्के भरल्याने सिंचनासह पिण्याचा पाण्याचाही प्रश्न मिटला आहे. जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत ६७५ मिमी पाऊस झाला आहे. त्यात गिरणा, वाघूर व तापी या तीन महत्वाच्या नद्यांच्या पाणलोट क्षेत्रातदेखील दमदार पाऊस झाल्यामुळे या तिन्ही मोठ्या प्रकल्पांमध्ये उपयुक्त जलसाठा झाला आहे. गिरणा धरण १०० टक्के भरल्यामुळे जिल्ह्यातील ४६ हजार हेक्टर क्षेत्राचा सिंचनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे.