पाचोरा तालुक्यातील कृष्णापुरी येथील घटना
पाचोरा (प्रतिनिधी) : तालुक्यातील हिवरा नदीकाठी असलेल्या कृष्णापुरी येथे आज दिनांक २९ सप्टेंबर रोजी दुपारी मातीचे घर कोसळून झालेल्या भीषण अपघातात महेश नितीन पाटील (वय अंदाजे १०) या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर त्याचा मावस भाऊ योगेश बाळू चव्हाण (वय १५) गंभीर जखमी झाला असून त्याला तात्काळ उपचारासाठी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मृत महेश हा मजुरी करणारे विठ्ठल बेलेकर यांचा नातू असून, मागील दोन वर्षांपासून मामाकडे कृष्णापुरी येथे राहत होता. दुपारी ४ वाजता घर अचानक कोसळले, दोघे भाऊ मातीच्या ढिगाऱ्याखाली दबले. स्थानिकांनी मदतकार्य सुरू केले. मात्र महेशचा गुदमरून जागीच मृत्यू झाला.
नववीत शिकणाऱ्या योगेशला नागरिकांनी रुग्णवाहिकेतून तातडीने रुग्णालयात हलवले. घटनेची माहिती मिळताच नगर परिषदेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी टीम पाठवली. तहसीलदार विजय बनसोडे व तलाठी माधुरी चौधरी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. तसेच आमदार किशोर पाटील यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन माहिती जाणून घेतली. दरम्यान या घटनेमुळे मजुराच्या कुटुंबावर आघात कोसळला असून पाचोरा तालुक्यावर शोककळा पसरली आहे. शासनाने तात्काळ मयत बालकाचे कुटुंबीयांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.