माझ्या जीवाची जबाबदारी राज्य सरकारची : आ. खडसे यांची प्रतिक्रिया

जळगाव (प्रतिनिधी) : आमदार एकनाथराव खडसे यांची वाय दर्जाची सुरक्षा काढून घेण्याचे आदेश राज्याच्या गृह विभागाने गुरुवारी मध्यरात्रीनंतर दिले. त्यानंतर त्यांची वाय दर्जाची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे.दरम्यान, माझ्या जीवाची जबाबदारी जर राज्य सरकार घेत असेल तर मला सुरक्षेची गरज नाही, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री खडसे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
वर्षभरापूर्वी महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना अंडरवर्ल्ड, सौदी अरेबिया आदी ठिकाणहून धमकीचे फोन येत होते. यावर खडसे म्हणाले की, तत्कालीन सरकारने मला सुरक्षा प्रदान केली होती. त्यानंतर रश्मी शुक्ला नावाच्या पोलिस अधिकाऱ्यांनी माझे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत काय किंवा अंडरवर्ल्ड मला धमकी देते काय अशा कारणावरून फोन टॅपिंग करण्याचे प्रकरण घडले होते.
आता राज्य शासनाने माझी सुरक्षा काढून घेतली आहे. माझ्या जीवाची जबाबदारी राज्य सरकार घेत असेल तर मला सुरक्षेची गरज नाही. माझा फोन टॅपिंग का झाला मला माहिती नाही. कुठून तरी मला धोका असेल, त्यामुळे माझे संरक्षण कायम ठेवले होते अशी माहिती आ. एकनाथराव खडसे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. दरम्यान आता भाजप शिंदे सरकार राज्यात आल्यानंतर आमदार खडसे यांची सुरक्षा काढून घेतल्यामुळे राज्यात चर्चेला उधाण आले आहे. हे सूडबुद्धीचे राजकारण तर नाही ना अशी चर्चा आता विरोधी पक्षांमध्ये होत आहे.









