राज्य शासनाच्या नाकर्तेपणाचा निषेध
चंद्रकांत कोळी
रावेर (प्रतिनिधी) :- शेतकरी संघर्ष समितीतर्फे रावेर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात मंगळवारी ३ ऑक्टोबर रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या केळी पीक विम्याची मंजूर असलेली रक्कम मिळावी, सी एम व्ही रोगाने बाधित झालेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना भरपाई मिळावी अशा विविध मागण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
शेतक-यांनी सुमारे एक तास अंकलेश्वर-बुरहानपुर महामार्ग रोखुन धरला. यामुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.अखेर प्रशासनाच्या मध्यस्थीमुळे शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेत विमा कंपनीला आठ दिवसाची मुदत देण्यात आली आहे. आमदार,खासदार,मंत्री यांना त्यांचा हिस्सा मिळाल्याशिवाय शेतकऱ्यांच्या अकाउंटवर पैसे जमा होत नाहीत असा आरोप माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील यांनी आज रावेर येथे केला. पुढील सोमवार पर्यंत केळी उत्पादक शेतकरी यांच्या खात्यावर विम्याचे पैसे न जमा झाल्यास रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व संचालक मंडळ रावेर तहसील येथे आमरण उपोषण करणार असल्याची माहिती देखील रमेश पाटील यांनी दिली.
आंदोलनात यावल रावेर मतदारसंघाचे आ. शिरीष चौधरी यांनी उपस्थिती देत शेतकऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला. जयेश कुयटे, गणेश महाजन, डॉ राजेंद्र पाटील, योगिराज पाटील, माजी सभापती निळकंठ चौधरी, सेल तालुकाध्यक्ष सुनिल कोंडे, माजी जि.प. सदस्य रमेश पाटील, शिवसेना (उबाठा) तालुकाध्यक्ष प्रवीण पंडी,त सुरेश पाटील, जिजाबराव पाटील, कॉग्रेस शहराध्यक्ष संतोष पाटील, माजी पं.स. सदस्य दिपक पाटील, विनोद पाटील, डी.डी. वाणी, राहुल महाजन, जितु पाटील, गणेश चौधरी यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी आंदोलनाला उपस्थित होते.