वरणगाव ( प्रतिनिधी ) – भुसावळ तालुक्यातील काठोरा खुर्द गावात भरधाव ट्रॅक्टरने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी २६ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेआठ वाजता घडली. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात ट्रॅक्टरचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गंगाराम भास्कर पाटील (वय-५८) हे आपल्या कुटुंबासह रा. काठोरा खुर्द, ता.भुसावळ येथे राहायला होते. शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होते. गुरूवारी २६ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास ते घराच्या समोर उभे असतांना संकेत अनिल पाटील रा. काठोरा खुर्द याने भरधाव वेगाने ट्रॅक्टर चालवून गंगाराम पाटील याना जोरदार धडक दिली.
त्यात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. यावेळी गावातील गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार ट्रॅक्टरचालक संकेत अनिल पाटील याच्या विरोधात वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ मनोहर पाटील करीत आहे.