कोलकाता ( प्रतिनिधी ) – पहिल्या व दुसऱ्या लाटेतील कोरोनाच्या लक्षणांमध्ये आता बदल झाले आहेत या साथीची तीव्रता बऱ्याच प्रमाणात कमी झाली असल्याचे निरीक्षण कोलकातातील डॉक्टरांनी नोंदविले आहे.
सध्या कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची लक्षणीय संख्या आहे. पहिल्या व दुसऱ्या लाटेत रुग्णांना जो भयानक त्रास झाला तसे चित्र सध्या नाही. त्यामुळे अनेक कोरोना रुग्णांची नोंदणी होताना दिसत नाही. आरटीपीसीआर चाचणी करून घेण्याचा डॉक्टरांनी दिलेला सल्ला काही रुग्ण पाळत नाहीत. गेल्या महिन्यात कोरोना संसर्गाची लक्षणे बदलली असून आता ती फारशी तीव्र नाहीत, असे डॉक्टरांनी सांगितले.
कोलकातातील डॉक्टरांना आढळले की, पहिल्या व दुसऱ्या लाटेत रुग्णांना काही दिवस वास येत नसे, त्यांच्या तोंडाला चव कळत नव्हती. १० ते १५ टक्के रुग्णांना श्वसनाचा त्रास व्हायचा, १० टक्के जणांना रुग्णालयात दाखल करावे लागायचे.
सध्या कोरोना संसर्ग झाल्यावर सात-आठ दिवसांनी वास येईनासा होतो. चव कळत नाही. कफ होतो व अगदी कमी प्रमाणात ताप येतो. फारसा अशक्तपणा येत नाही. फक्त १ टक्क्यांहून कमी लोकांना श्वसनाचा त्रास होतो व रुग्णालयात दाखल करावे लागते. अनेकांनी दुसरा डोस घेऊन आता सहा महिने उलटले आहेत. त्यामुळे अशा लोकांना पुन्हा संसर्ग होऊ नये यासाठी उपाययोजना अंमलात आली पाहिजे.
मागील २४ तासांत देशात ५५५ जणांचा मृत्यू झाला. त्यात सर्वाधिक ४७१ मृत्यू केरळातील, तर ४१ मृत्यू महाराष्ट्रातील आहेत. मृतांची एकूण संख्या आता ४,६३,२४५ व कोरोनाचा मृत्युदर १.३५ टक्के झाला आहे.