मुक्ताईनगर तालुक्यातील मधापुरी येथील घटना
मुक्ताईनगर ( प्रतिनिधी ) – मलकापुर तालुक्यातील धुपेश्वर येथील मंदिरात दर्शन करण्यासाठी आलेल्या कर्नाटकातील दोघांना मारहाण करून त्यांच्याकडील सुमारे साडेआठ लाख रूपयांचा ऐवज लुटण्यात आल्याची धक्कादायक घटना तालुक्यात मधापुरी येथे घडली असून या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
कर्नाटकातील बंगळुरू येथील निवासी अभिषेक एस. सी. हे आपला मित्र सतीश यांच्यासह कारने मलकापुर तालुक्यातील धुपेश्वर येथील मंदिरात दर्शनासाठी आले होते. दर्शन घेऊन ते शनिवार दिनांक २२ मार्च रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास अजिंठा येथे जाण्यासाठी निघाले. रस्त्यात पुर्णा नदी ओलांडल्यानंतर मुक्ताईनगर तालुक्यातील हद्दीत त्यांना एक महिला भेटली. तिने मधापुरी धरणाजवळ रिसॉर्ट बांधण्यासाठी खूप चांगली जमीन विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे सांगितले. अभिषेक हे व्यावसायिक असल्याने त्यांनी यात रस दाखविला. यानंतर त्या महिलेच्या पाठोपाठ ते मधापुरी गावात गेले. येथे अचानक दहा जणांनी त्यांना घेरले. या दोघांना त्यांनी एका घरात नेऊन लाथा-बुक्यांनी मारहाण केली.
याप्रसंगी या सर्वांनी अभिषेक व सतीश यांच्याकडील दोन लाख रूपयांची रोकड, सुमारे ७५ हजार रूपयांची अंगठी व दीड लाख रूपयांचे ब्रेसलेट, पंचवीस हजार रूपयांचा स्मार्टफोन आदी हिसकावून घेतले. यासोबत त्यांच्याकडील क्रेडीट कार्ड व डेबीट कार्ड वरून युपीआयच्या मदतीने ४ लाख रूपये तात्काळ ट्रान्सफर करण्यात आले. अशा प्रकारे अभिषेक व सतीश यांच्याकडील सुमारे साडेआठ लाख रूपयांचा ऐवज लुटण्यात आला. यानंतर या दोघांचे हरीणासारख्या प्राण्यांच्या कातड्यासोबत फोटो काढण्यात आले. तुम्ही पोलीसात तक्रार केली तर हे फोटो सोशल मीडियात व्हायरल करण्यात येईल अशी धमकी त्यांनी दिली. यानंतर या सर्वांनी तेथून पलायन केले.
यानंतर अभिषेक व सतीश यांनी मुक्ताईनगर पोलीस स्थानक गाठून पोलिसांना आपबिती कथन केली. अभिषेक एस. सी. (वय २८, रा. बंगळुरू, कर्नाटक) यांनी मुक्ताईनगर पोलीस स्थानकात फिर्याद दिली. यानुसार, अज्ञात १० जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरिक्षक नयन पाटील हे करीत आहेत.