जळगाव तालुक्यातील डिकसाई येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : – घरावर कर्जाचा डोंगर चढला. कर्ज कसे फेडायचे या विंवचतेनून विवाहितेने विषप्राशन केल्याची घटना जळगाव तालुक्यातील डिकसाई येथे घडली होती. दरम्यान उपचार सुरू असताना या विवाहितेचा गुरुवारी १ फेब्रुवारी रोजी दुपारी मृत्यू झाला आहे. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जागृती अरुण कोळी (वय ३२) असे मृत झालेल्या महिलेची नाव आहे. जागृती कोळी या पती अरुण कोळी व पहिलीत असलेल्या मुलासोबत डीकसाई येथे वास्तव्यास होत्या. अरुण कोळी हे स्वत:जवळील शेतीसोबतच गावातील इतरांची शेती करारवर घेऊन करत होते. मात्र, यंदा पाऊस कमी झाल्यामुळे अरुण कोळी यांना उत्पादन कमी झाले. त्यात शेतीसाठी कर्ज घेतल्यामुळे आर्थिक अडचणी उभ्या राहिल्या. २५ जानेवारी रोजी संध्याकाळी ७ वाजता जागृती कोळी या घरात आपल्या मुलासोबत असताना, जागृती यांनी विषप्राशन केले.
आईला त्रास होत असल्याचे पाहून, लहान मुलगा ‘आईने विष घेतले’ असे म्हणत गल्लीत धावत सुटला. शेजारच्यांना हा प्रकार लक्षात आल्यानंतर तातडीने जागृती कोळी यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. गेल्या आठवडाभरापासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. गुरुवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान जागृती कोळी यांचा मृत्यू झाला.
यानंतर कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.