चाळीसगाव तालुक्यातील शिदवाडी येथील घटना
चाळीसगाव (प्रतिनिधी) – कर्जबाजारी झाल्याने तालुक्यातील शेतकऱ्याने विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना चाळीसगाव तालुक्यातील शिदवाडी येथे घडली. मेहूणबारे पोलीस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
शिदवाडी येथील शेतकरी नेताजी रामदास पाटील (वय ६८) हे शेती करून कुटुंबाची गुजराण करत होते. नेताजी पाटील यांच्यावर शेतीचे तसेच बाहेरील कर्ज होते. त्यातच यंदा पाऊस वेळेवर पडला नाही. म्हणून दुबार पेरणी करावी लागल्याने ते चिंतीत होते. गुरूवारी ६ जूनला सकाळी ९ वाजता ते गावातीलच लक्ष्मण कोठारे यांच्या शेतात कामाला गेले. सायंकाळी ४ वाजता पाऊस झाल्याने परिसरातील शेतकरी घरी गेले. मात्र नेताजी पाटील हे सायंकाळी घरी परतले नाही. यामुळे त्यांच्या कुटुंबियासह गावकऱ्यांनी त्यांचा शोध घेतला असता कोठारे यांच्या शेतातील विहिरीजवळ बुट दिसून आले. त्यामुळे नेताजी पाटील यांनी विहीरीत उडी मारून जीवाचे बरेवाईट केल्याची कुटुंबियाला शंका आली.
शुक्रवारी ७ जून रोजी सकाळी शेतातील राखण करणाऱ्या पावरा समाजाच्या मजुरांनी विहीरीत उतरून त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र विहरीतील पाणी खोल व गाळ असल्याने त्यांच्याकडून थांगपत्ता लागला नाही. उपखेड येथील एका इसमास बोलावल्यानंतर त्याने विहीरीत उडी घेऊन पाण्यातील गाळातून नेताजी पाटील यांचा मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर त्यांचा मृतदेह ग्रामीण रूग्णालय मेहूणबारे येथे नेण्यात आला. याप्रकरणी संजय नाना पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून मेहूणबारे पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.