जळगावात बंदीच्या आईकडून मागितली होती लाच
जळगाव (प्रतिनिधी) :- येथील जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या मुलाला भेटण्यासाठी आईकडून २ हजारांची लाच घेणाऱ्या सुभेदारासह दोन महिला पोलीसांना धुळे लाचलुचपत विभागाच्या पथकाने बुधवारी रंगेहात पकडले होते. या गुन्ह्यातील अटकेतील तीनही संशयित आरोपींना गुरूवारी ९ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता जळगाव जिल्हा न्यायालयात हजर केले असता त्यांना सोमवार दि. ११ नोव्हेंबर रोजीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
तक्रारदार महिलेचा मुलगा हा जिल्हा कारागृहात एका गंभीर गुन्ह्यात न्यायालयीन पोलीस कोठडीत आहे. त्याला भेटण्यासाठी महिलेकडून २ हजार रूपयांची लाचेची मागणी कारागृहातील सुभेदार भीमा उखर्डू भिल, महिला पोलीस पूजा सोपान सोनवणे व हेमलता गयबू पाटील यांनी केली. दरम्यान, महिलेने याबाबत धुळे लाचलुचपत विभागाला तक्रार दिली. त्यानुसार पथकाने बुधवारी ८ नोव्हेबर रोजी दुपारी २ वाजता जिल्हा कारागृहातच्या आवारात सापळा रचला.
महिला पोलीस कर्मचारी पूजा सोपान सोनवणे व हेमलता गैबू पाटील यांनी सुभेदार भीमा उखर्डू भिल यांच्या सांगण्यावरून तक्रारदार महिलेकडून दोन हजार रक्कम घेतांना धुळे पथकाने रंगेहात पकडले. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली. अटकेतील तिघा संशयित आरोपींना गुरूवारी ९ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता जळगाव जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिघांना ११ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नेत्रा एन. जाधव करीत आहे.