जळगाव जिल्ह्यालाही मिळणार २३ जणांचे मनुष्यबळ
उत्तर महाराष्ट्रातील कारागृहांसाठी आता नवीन प्रादेशिक कार्यालय
जळगाव (प्रतिनिधी) : राज्यभरातील ६० कारागृहांकरिता नवीन २ हजार पदनिर्मिती करण्यासाठी गृह विभागाने नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार शुक्रवारी ६ ऑक्टोबर रोजी शासन आदेश पारित केला आहे. यामुळे राज्यातील तुरुंगांमधील मनुष्यबळाचा प्रश्न काहीसा सुटणार आहे. यात जळगाव जिल्ह्यासाठी एकूण २३ विविध पदांचा समावेश आहे. तसेच, कारागृह विभागांतर्गत असलेल्या मध्य विभाग या प्रादेशिक कार्यालयाचे विभाजन करून जळगावसह उत्तर महाराष्ट्रातील कारागृहांसाठी नाशिक येथे नवीन प्रादेशिक कार्यालय निर्माण करण्यास या परिपत्रकानुसार तत्वत: मान्यता देण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्यातील कारागृह विभागातील कारागृहांच्या वर्गीकरणानुसार ९ मध्यवर्ती कारागृहे, जिल्हा कारागृहे-२८, विशेष कारागृह-१, किशोर सुधारालय, नाशिक-१, महिला कारागृह – १, खुली कारागृहे- १९ आणि खुली वसाहत, आटपाडी-१, असे एकूण ६० कारागृहे आहेत. दि. १२.०८.२०२२ च्या शासन निर्णयाव्दारे कारागृह विभागाचा ५०६८ पदांचा सुधारित आकृतीबंध मंजूर करण्यात आला असून सद्यस्थितीत कारागृहातील बंदीस्त बंद्याच्या अधिकृत क्षमतेपेक्षा अतिरिक्त बंदी कारागृहात बंदीस्त आहे.
सदर वस्तुस्थिती विचारात घेता कारागृह विभागात विविध संवर्गात नवीन पदनिर्मितीची बाब शासनाच्या विचाराधीन होती. मंत्रिमंडळाने दि. ३ ऑक्टोबर २०२३ रोजीच्या बैठकीत दिलेल्या मान्यतेस अनुसरून गृह विभागाच्या अधिनस्त कारागृह विभागात सद्यस्थितीत मंजूर असलेल्या ५०६८ पदांव्यतिरिक्त पुढीलप्रमाणे विविध संवर्गात २००० नवीन पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
नाशिकला होणार नवीन प्रादेशिक कार्यालय
कारागृह विभागांतर्गत असलेल्या मध्य विभाग या प्रादेशिक कार्यालयाचे विभाजन करून नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह, धुळे, नंदुरबार, जळगाव, भुसावळ, अहमदनगर ही जिल्हा कारागृहे, विसापुर खुले जिल्हा कारागृह व किशोर सुधारालय, नाशिक या संस्थांच्या समावेशासह नाशिक येथे नवीन प्रादेशिक कार्यालय निर्माण करण्यास या परिपत्रकानुसार तत्वत: मान्यता देण्यात आली आहे. सदर परिपत्रकावर गृह विभागाचे उपसचिव विनायक चव्हाण यांची स्वाक्षरी आहे.
जळगाव कारागृहासाठी होणारी पदनिर्मिती
तुरुंग अधिकारी श्रेणी १ – पद १
तुरुंग अधिकारी श्रेणी २ – पद १
वैद्यकीय अधिकारी वर्ग ३ – पद १
मिश्रक – पद १
हवालदार – पद ३
कारागृह शिपाई – पद १५
परिचारक – पद १
एकूण – २३ पदे