जामनेरच्या भावांविरुद्ध गुन्हा दाखल, अमळनेर येथील घटना
अमळनेर (प्रतिनिधी) :- ऑप्टिकल फायबर टाकण्याचा कंत्राट देतो अशी बतावणी करून जामनेरच्या सुमारे साडे ११ लाख रुपये घेऊन पवन चौकातील एकाची फसवणूक केल्याची घटना घडली. याप्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विजय धनराज पाटील (रा. पवन चौक) येथे व्यंकटेश इंटरप्रायझेस नावाची फर्म असून दि. १५ ऑगस्ट २०२० रोजी सायंकाळी ५ वाजता त्यांच्या ओळखीचे जामनेर येथील राहुल दत्तात्रय चव्हाण, सागर दत्तात्रय चव्हाण या दोघांनी विजयच्या घरी येऊन तुम्हाला ऑप्टिकल फायबर कंत्राट देतो असे सांगून १५ लाख रुपयांची मागणी केली. विजय याने टप्प्याटप्याने ११ लाख ५० हजार रुपये दिले. मात्र दोघे चव्हाण बंधूनी ऑप्टिकल फायबर केबलचा ठेका दिला नाही. विजयने पैशाची मागणी केली असता दोघांनी तगादा लावू नको अन्यथा तुला संपवून टाकू अशी धमकी दिली. अमळनेर पोलीस स्टेशनला दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस निरीक्षक विकास देवरे करीत आहेत.