जळगाव तालुक्यातील कानळदा शिवारातील घटना
जळगाव प्रतिनिधी) : तालुक्यातील कानळदा येथील शेत शिवारात विहिरीमध्ये काम करीत असताना एका इसमाचा कमरेची दोरी तुटून पाण्यात पडल्याने बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवार दि. २१ मे रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे.
गोपीचंद पंढरीनाथ बाविस्कर (वय ५८, रा. कानळदा ता. जळगाव) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. ते गावात मुलगा, सून, नातू यांच्यासह राहत होते. विहीर दुरुस्तीचे काम करून ते परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. मंगळवार दि. २१ मे रोजी सकाळी ११ वाजता ते कानळदा परिसरातील विश्वास नाना पाटील यांच्या शेत शिवारातील विहिरीमध्ये विहिरीचे काम करण्यासाठी काही कामगारांसह उतरले होते.
त्यावेळेला प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या कमरेला दोरी होती. ती दोरी तुटल्याने ते विहिरीतील पाण्यात पडले. पोहता न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. यानंतर ग्रामस्थांनी तातडीने त्यांना विहिरीतून बाहेर काढत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. निरंजन देशमुख यांनी तपासणीअंति त्यांना मयत घोषित केले.
यावेळी कुटुंबीयांनी एकाच आक्रोश केला.जळगाव तालुका पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.