एमआयडीसी पोलीस स्टेशनची कामगिरी
जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील कांद्याच्या व्यापाऱ्याला चाकूचा धाक दाखवून रोकड लुटून दहशत निर्माण करणाऱ्या अमन ऊर्फ ‘खेकडा’ सय्यद रशीद या सराईत गुन्हेगाराला एमआयडीसी पोलिसांनी मंगळवार १५ जुलै रोजी रात्री ११ वाजता मोठ्या शिताफीने अटक केली आहे. बुधवारी १६ जुलै रोजी दुपारी ३ वाजता जिल्हा न्यायालयाने त्याला १८ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
शनिवारी १२ जुलै रोजी रात्री ११.४५ वाजताच्या सुमारास सय्यद फैय्याज गयासुद्दीन (वय ५२, रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव) हे ममता बेकरीकडून सुप्रीम कॉलनीकडे पायी जात होते. हुसैनी चौकात अमन ऊर्फ ‘खेकडा’ सय्यद रशीद (रा. सुप्रीम कॉलनी) याने त्यांचा रस्ता अडवला. चाकूचा धाक दाखवून त्यांना मारहाण केली आणि त्यांच्या शर्टाच्या खिशातील १४ हजार ७०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले. या घटनेनंतर सय्यद फैय्याज गयासुद्दीन यांनी तात्काळ एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकाला आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार, पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, नितीन ठाकूर, गणेश ठाकरे आणि राहुल घेटे यांच्या पथकाने गोपनीय बातमीदारांच्या मदतीने तपास सुरू केला. १५ जुलै रोजी रात्री ११ वाजता ‘खेकडा’ हा अजिंठा चौफुली परिसरात फिरत असल्याची खात्रीशीर माहिती पथकाला मिळाली. तात्काळ पथकाने घटनास्थळी धाव घेत अमन ऊर्फ ‘खेकडा’ सय्यद रशीदला ताब्यात घेतले आणि अटक केली.