जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरालगतच्या कानळदा ते जळगाव रस्त्यावरील अत्तरदे पेट्रोल पंपासमोर विनापरवाना व बेकायदेशीररीत्या वाळूची चोरटी वाहतूक करणारा डंपर जळगाव तालुका पोलिसांनी रंगेहात पकडला आहे. या कारवाईत सुमारे २ ब्रास वाळू व अशोक लेलँड कंपनीचा डंपर असा एकूण ५ लाख ४८ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका मजुरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल नथ्थु निंबा भदाणे (वय ५६) हे पोलीस पथकासह गस्तीवर असताना १६ ऑक्टोबर २०२६ रोजी मध्यरात्री ००:३० वाजेच्या सुमारास कानळदा रस्त्यावरून पिवळ्या रंगाचा अशोक लेलँड डंपर (क्रमांक MH-19-Z-3192) संशयास्पदरीत्या येताना दिसला. पोलिसांनी वाहनाची पाहणी केली असता, त्यात कोणताही अधिकृत वाहतूक परवाना किंवा पास नसताना अंदाजे २ ब्रास गौण खनिज (वाळू) आढळून आली.
या कारवाईत पोलिसांनी ४८ हजार ४६० रुपये किमतीची २ ब्रास वाळू आणि ५ लाख रुपये किमतीचा डंपर असा एकूण ५,४८,४६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी आरोपी डंपर चालक चेतन कैलास कोळी (वय २८, धंदा- मजुरी, रा. इंदिरा नगर, भादली, ता. जि. जळगाव) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२), ३०५(e) सह गौण खनिजे विकास व विनियमन अधिनियम कलम २१ आणि महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८(७)(८) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांनी भेट दिली असून पोलीस नाईक विजय निकम या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.






