भाविकांची राज्यभरातून होणार गर्दी
पाचोरा (प्रतिनिधी) :- तालुकयातील काकणबर्डीच्या खंडोबा महाराजांचा यात्रोत्सव सोमवारी दि. १८ पासून सुरु होत आहे. तालुक्यातील विविध यात्रांमधील हा पहिलाच यात्रोत्सव असल्याने भाविकांच्या उत्साहाला उधाण आले आहे. पाचोरा – गिरड रस्त्यावर शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य वातावरणात खंडोबाचे ऐतिहासिक व जागृत देवस्थान असलेली काकणबर्डी आहे. या टेकडीवर खंडोबा महाराजांनी आपल्या दुसऱ्या विवाहानंतरचे धार्मिक विधी केले व विवाहप्रसंगी हातावर बांधलेले काकण सोडले म्हणून या टेकडीला काकणबर्डी असे नाव पडल्याची आख्यायिका आहे.
दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात चंपाचष्ठीला यात्रा भरते. यात्रेव्यतिरिक्तही इतर रविवारी येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष करीत भंडारा उधळत भाविक मोठ्या संख्येने येतात. नवस मानतात व नवस फेडतात. भाविकांकडून ‘जय मल्हार’च्या गजरात हळद- खोबरे उधळून मल्हारी मार्तंडची तळी उचलली जाते. आरती व सदानंदाचा येळकोट- येळकोटचा गजर करून भरीत व बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य चढविला जातो. यात्रेस शेकडो वर्षांची परंपरा असून, राज्यभरातून भाविक दर्शनास येतात. टेकडीवर चढण्यासाठी पायऱ्या व भाविकांच्या सोयीसाठी भक्त निवास तसेच पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची सोय करण्यात आली असल्याने यात्रेसह दर रविवारी येथे भाविक मोठ्या प्रमाणात येतात.
खंडोबा महाराजांना हळद व खोबऱ्याचा भंडारा उधळून पूजा करण्याची प्रथा असून, सदानंदाचा येळकोटाचा गजर करून बाजरीची भाकर, कांद्याची पात टाकून केलेले वांग्याचे भरीत यांचा नैवेद्य दिला जातो. यात्रोत्सवात विविध वस्तू, खाद्यपदार्थ, खेळणी विक्रीची व मिठाईची दुकाने तसेच लहान मोठे पाळणे लावले जातात. भाविकांची मोठी गर्दी दरवर्षीप्रमाणे होणार असून यात्रेसाठी सज्ज झालेले आहेत.