भडगाव तालुक्यातील खळबळजनक घटना, ३ वृद्ध नागरिक जखमी
भडगाव (प्रतिनिधी) – येथील गोंडगाव रोडवरील रहिवासी ओंकार रामदास चव्हाण व स्टेशन भागातील रहिवासी राजश्री नितीन देशमुख यांच्या घरावर सशस्त्र दरोडेखोरांनी दरोडा टाकत सोने चांदीसह रोकड असा ५ लाख ५१ हजार रुपयांचा ऐवज लांबविला आहे. घटनेमुळे भडगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना सोमवारी पहाटे १ ते अडीच दरम्यान घडलेली आहे.
कजगाव येथील स्टेशन भागातील रहिवासी असलेल्या राजश्री नितीन देशमुख (वय ४८) ह्या घरात एकट्याच होत्या. त्यांच्या घराचा दरवाजाचा कडीकोंडा तोडत दरोडेखोरांनी आत प्रवेश केला. कपाटात ठेवलेले व अंगावरील सोने असे तलवार, लोखंडी रॉडचा धाक दाखवून महिलेस मारहाण केली. या घरात साडेसात तोळे सोने व एक लाख रुपये रोख दरोडेखोरांनी घेतले. नंतर तेथुन काही अंतरावर असलेल्या बापु खोमणे यांच्या घराचा कडीकोंडा तोडण्यासाठी प्रयत्न सुरू केला. मात्र बापु खोमणे यांना दरोडेखोर आले असल्याचा फोन आल्याने ते जागे झाले. तेव्हा दरोडेखोरांनी तेथुन पळ काढला. तेथुन काही अंतरावर असलेल्या कजगाव गोंडगाव मार्गावरील रहिवासी ओंकार रामदास चव्हाण यांच्या घराकडे मोर्चा वळविला.
तेथे बाहेर झोपलेले ओंकार चव्हाण यांना या दरोडेखोरांनी जबर मारहाण करत घरात प्रवेश केला. एका खोलीमध्ये त्यांची पत्नी ताराबाई ओंकार चव्हाण या झोपलेल्या होत्या. दरोडेखोरांनी त्याच्यावर हल्ला करत तलवार रोखत अंगावरील चांदीचे कडे (गोट) एक किलो वजनाचे तसेच अंगावरील सोन्याची पोत, कानातले असं अडीच तोळे सोने लांबविले. तसेच आरती समाधान चव्हाण यांचे अंगावरील अडीच तोळे सोनेसह ८५ हजार रुपये रोख असा चार ते पाच लाखाचा ऐवज दरोडेखोरांनी लांबवला. ताराबाई चव्हाण यांच्या कानातील बाळी चक्क कानाला जबर दुखापत करत नेली. समाधान चव्हाण यांच्या लहान बाळाच्या गळ्यावर तलवार लावत दहशत निर्माण करत सारा ऐवज दरोडेखोरांनी लुटून नेला, असे प्रत्यक्षदर्शी सांगत आहेत.
दरोडेखोरांनी ओंकार चव्हाण (वय ६८) यांना दोघ पायावर मोठ्या प्रमाणावर तसेच ताराबाई चव्हाण यांच्या कानास व हातावर मारून मोठी दुखापत केली तर समाधान चव्हाण यास देखील जबर मारहाण दरोडेखोरांनी केली. नागरिकांना घटनेची माहिती मिळताच त्यांची चव्हाण यांच्या घराकडे धाव घेतली. मात्र दरोडेखोर पसार झाले. भडगाव पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, डीवायएसपी अभयसिंग देशमुख, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, एपीआय चंद्रसेन पालकर, फौजदार डोमाळे, गुन्हे शाखेचे लक्ष्मण पाटील, कजगाव पोलीस चौकीचे नरेंद्र विसपुते यांचेसह भडगाव पोलीस स्टेशनचे पोलिस कर्मचारी दाखल झाले होते. तपास एपीआय चंद्रसेन पालकर करीत आहेत.