काबूल (वृत्तसंस्था) अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील एका मशिदीत काल झालेल्या बॉम्बस्फोटात किमान २१जण ठार आणि ३३ जण जखमी झाले आहेत.काबूल शहरातील खेर खाना भागातील सिद्दीकीया मशिदीमध्ये संध्याकाळची प्रार्थना संपण्याच्यावेळी हा बॉम्बस्फोट झाला. जखमींमध्ये काही लहान मुलेही आहेत. तर मरण पावणाऱ्यांमध्ये मशिदीच्या मौलवीचाही समावेश आहे.
हा एक आत्मघातकी बॉम्बस्फोट होता, असे प्रत्यक्ष साक्षीदारांनी सांगितले. स्फोटातील मृतांची संख्या अधिक असण्याची शक्यता एका अन्य साक्षीदाराने व्यक्त केली. आतापर्यंत या बॉम्बस्फोटाची जबाबदारी कोणत्याही दहशतवादी संघटनेने घेतलेली नाही. मात्र हा स्फोट इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने केला असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतो आहे.