चाळीसगाव तालुक्यात जुनोने येथील घटना
चाळीसगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील जुनोने येथे किरकोळ कारणावरून पत्नीस शिवीगाळ करणाऱ्यांना जाब विचारला असता पतीस चौघांनी मारहाण केली. या चौघांविरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि. १९ रोजी सकाळी १० वाजता घडली.
जुनोने येथील कृष्णा हरी राठोड हे कुटुंबासह शेतात राहतात. त्यांची पत्नी शेतात जात असताना शेजारी राहणाऱ्या रोहिदास भाईदास राठोड याने शिवीगाळ केली. ही बाब पत्नीने पतीला सांगितली. शिवीगाळ का केली, असा जाब विचारला असता कृष्णा यास चौघांनी चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. योगेश भाईदास राठोड व भाईदास झिपा राठोड यांनीही धाव घेत मारहाण केली. तसेच हातातील लोखंडी टॉमीने कपाळावर, डोक्यावर व पाठीवर मारले. हातातील काठीनेही मारहाण केली व ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी कृष्णा राठोड याने दिलेल्या फिर्यादीवरून रोहीदास भाईदास राठोड, योगेश भाईदास राठोड, भाईदास झिपा राठोड व संतोष एकनाथ राठोड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.