पैशांनी श्रीमंत असलेली माणसं पावला–पावलावर भेटतात. पण मनाने श्रीमंत असणारी माणसं भेटण्यासाठी आपणास पावलं झिजवावी लागतात. असंच मनानं श्रीमंत असलेल्या पद्यश्री डॉ. भवरलालजी जैन उर्फ मोठे भाऊ… श्रद्धेय भाऊंचा 25 फेब्रुवारी रोजी स्मृतिदिन असतो. त्या औचित्याने भाऊंच्या गुणवैशिष्ट्यांबाबत लेख…

भाऊंचा जन्म दि.१२ डिसेंबर १९३७ रोजी हिरालालजी–गौराबाई यांच्या घरी झाला.वाकोद हे त्यांचे जन्म गाव. भाऊ एक प्रसिध्द उद्योगपती,साहित्यिक, विचारवंत, गांधीवादी होते. माणूस हा सौंदर्यवादी आहे. परंतु भाऊंनी जीवनात सौंदर्याला महत्व दिले नाही तर त्यांनी आपल्या सोबत दुसऱ्याच्या जिवनात सौंदर्य फुलवण्याचे काम केले आहे. त्यांचा चेहरा सदैव प्रसन्न असायचा. प्रेमळ, सात्विक, साधी राहणी, उच्च विचारसरणी अशी भाऊंची प्रतिमा होती.
मुंबई विद्यापीठातून भाऊंनी डबल ग्रॅज्युएट केले. त्यांना चांगली सरकारी नोकरी चालत आली. ते आई गौराईच्या पाया पडून आशिर्वाद घेण्यासाठी गेले. तेव्हा आईने आग्रह करून संयुक्त कुटुंबातील बचत सात हजार रूपये व्यवसाय सुरू करण्यासाठी देण्याबाबत विचारणा केली. त्याचा सकारात्मक परिणाम म्हणजे आजचे उभे राहिलेले कृषि विश्व.
आईने दिलेल्या पैशांतून त्यांनी सुरुवातीला रॉकेल, पेट्रोलचा व्यवसाय सुरू केला. व्यवसाय करण्याची त्यांची दूरदृष्टी व पारदर्शकता यामुळे काही वर्षातच ते ट्रॅक्टर, मोटारसायकल, बी–बियाणे, खते, पाईप, किटकनाशक इ. उत्पादनांचे प्रांतीय तथा राष्ट्रीय स्तरावरचे नामवंत अधिकृत विक्रेते होऊ शकले. भाऊंमध्ये सदैव नाविण्याचा ध्यास व प्रचंड सकारात्मक उर्जा असल्यामुळे ज्यांच्या कामाला त्यांनी हात लावला. त्या–त्या कामाचं अर्थात व्यवसायाचं त्यांनी सोनं केल.
सुखाचेही आनंदाने स्वागत व दुःखाचेही आनंदानेच भाऊ स्वागत करायचे. अनेक कठीण प्रसंगांना त्यांनी खूप धैर्याने तोंड दिले व त्यात त्यांना यशही मिळाले. काही काळाने त्यांनी एक आजारी कारखाना विकत घेऊन त्यात पपेनचा व्यवसाय सुरू केला. या व्यावसायातही भाऊंनी गुणवत्ता जोपासली. त्यामुळे पपेनचे नावही साऱ्या विश्वात झाले. नदी जशी सतत वाहत असते ती तिचं काम थांबवत नाही. तीच ऊर्जा भाऊमध्ये होती. सतत नाविन्याचा ध्यास त्यांच्यात असायचा. पपेनच्या कारखान्यात त्यांनी पपईच्या चिकापासून पपेन निर्मितीचा कारखाना सुरू केला.
अवघ्या काही वर्षातच सुरु केलेल्या पीव्हीसी पाईपचा कारखाना भारतात प्रथम क्रमांकाचा ठरला. छोट्याशा नदीची आता मोठी गंगोत्री झालेली. भाऊंना या गंगोत्रिचे आता समुद्र करण्याचे स्वप्न होते. या भूमातेच्या पुत्राला शेती सुजलाम् सुफलाम् होण्याचे स्वप्न पाहिले. जैन इरिगेशन सि.लि. या कंपनीची स्थापना करून त्यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण केले. काही वर्षातच या कंपनीने भारतातून प्रथमच ड्रीप इरिगेशन निर्यात केली आणि राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी जैन इरिगेशनला गौरविण्यात आले.
मोठ्याभाऊंनी सुरुवातीपासूनच जीवनाच्या प्रत्येक पैलूंमध्ये अर्थात पारिवारीक, सामाजिक, धार्मिक, विज्ञान, कला, संस्कृती, शैक्षणिक, क्रीडा, वैद्यकीय क्षेत्रात रस घेतला. मध्यमवर्गीय या जळगाव शहरात भाऊंमुळे अनेकांच्या किंबहुना हजारोंच्या घरात चुली पेटल्या. याचे सर्व श्रेय गौराईंना, कारण भाऊंनी जर नोकरी केली असती तर आज हे शक्य नव्हते.
भाऊंनी जळगावचे नाव जगाच्या नकाशावर झळकावले अतिशय उनाड अशा जमिनीचा त्यांनी एक हिल्स स्टेशन बनवले अर्थातच जैन हिल्स निर्माण केले. या उनाड जागेने आज हिरवागार शालू नेसून दिमाखदारपणे सौंदर्याने नटलेली आहे. दुःखी मनाच्या माणसांनी एकदा तरी जैन हिल्सला भेट द्यावी. त्याचे दुःखी मन नक्की आनंदाने, प्रसन्नतेने भरून येईल. गरीबांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी अनुभूती शाळेची निर्मिती केली.
प्रचंड कामांचा व्याप सांभाळून भाऊंनी आई शारदेचीही सेवा केली. त्यांच्या नावावर अनेक पुस्तके प्रकाशित आहेत. त्यातीलच ‘ती आणि मी‘ हा आत्मकथन पर ग्रंथ खूप गाजला. एका पतीने पत्नीचे चरित्र लिहावे हा प्रकार सांस्कृतिक, साहित्य क्षेत्रातील ऐतिहासिक क्रांती आहे. सुवर्ण अक्षराने लिहावी अशी ती गोष्ट आहे. आजच्या पुरुषप्रधान संस्कृतित भाऊंनी सहचरिणीची अक्षरगाथा रेटवावी ही फार मोठी घटना आहे. निळ्याशार पाण्यात खडा टाकावा आणि त्यानंतर एखादा तरंग उठावा आणि तो एकरूप व्हावा असे हे पुस्तक आहे. भाऊंनी उद्योगाच्या क्षेत्रात तर जळगावचे नाव सात समुद्रापलीकडे तर नेलेच याचा आनंद सर्वांना असून गांधीतिर्थ जळगावात निर्माण करुन जळगावचे नाव पर्यटनाच्या नकाशावर नेले. महात्मा गांधींचे विचार जतन करून पुढील पिढ्यांपर्यंत नेणारे ८५ हजार चौरस फूट बांधकाम असलेले गांधीतिर्थ जोधपूरच्या लाल दगडात स्थापित आहे. गांधीजींच्या विचारांची चिरिस्थायी आठवण रहावी म्हणून हे तीर्थ उभारल्याचे भाऊ सांगत,
भाऊंनी जपलेली सामाजिक बांधीलकीमुळे त्यांना पद्मश्री सह अनेक सन्मानांनी गौरविण्यात आले. भाऊंचे कार्य समर्थपणे त्यांची चारही मुले सर्वश्री अशोकभाऊ, अनिलभाऊ, अजितभाऊ,अतुलभाऊ,पुढे नेत आहे. भाऊ जरी आपल्यात नसले तरी त्यांचे कार्य, विचार सर्वांच्या हृदयात आह व चिरकाल राहील यात तिळमात्र शंका नाही.
– सतीश दगडूलाल जैन, नाशिक ९६०४२४४५४७







