माजी तंत्रज्ञासह दोघांना मुद्देमालासह अटक, एलसीबीची अमळनेर तालुक्यात मंगरूळ येथे कारवाई


जळगाव (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मोबाईल टॉवरच्या बॅटरी चोरीस जाण्याचे प्रमाण वाढले होते. सदर गुन्ह्यात आरोपींचा शोध घेवून स्थानिक गुन्हे शाखेने त्यांचेवर कायदेशीर कारवाई केली आहे. अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथून “जीओ”च्या माजी तंत्रज्ञासह दोघांना अटक करण्यात आली असून एकाचा शोध सुरु आहे. दोघांना मारवड पोलीस स्टेशनला जमा करण्यात आले आहे.
जिओ मोबाईल टॉवरच्या बॅटरी चोरी करणारे चोरटे शोधण्यासाठी एलसीबीचे वरिष्ठ निरीक्षक बबन आव्हाड यांनी पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, पोलिस हवालदार संदिप पाटील, प्रविण मांडोळे, गोरख बागुल, नंदलाल पाटील, भगवान पाटील, राहुल कोळी, राहुल बैसाणे, विलास गायकवाड, भारत पाटील यांचे पथक तयार केले होते. (केसीएन)दि. १४ सप्टेंबर रोजी सदर पथकास गुप्त बातमीदारामार्फत या प्रकरणात मंगरुळ गावातील भिकन युवराज पाटील हा मुख्य संशयीत असल्याची बातमी मिळाली होती. त्यावरून पथकाने सदर संशयितास ताब्यात घेवून मोबाईल टॉवरचे बॅटरी चोरी प्रकरणात चौकशी केली. त्याने त्याच्यासोबत धर्मेंद्र फकिरा पाटील (रा. मंगरुळ) व अकरम अली कमरअली (रा. गांधलीपुरा अमळनेर) यांची नावे सांगितली.
त्यानुसार एलसीबीच्या पथकाने धर्मेद्र फकिरा पाटील यास ताब्यात घेवून अकरम अली कमरअली याचा अमळनेर शहरात शोध घेतला. मात्र, तो कुठेच मिळून आला नाही. संशयित आरोपी भिकन पाटील व धर्मेंद्र पाटील यांना विश्वासात घेवून मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्यांबाबत चौकशी केली. भिकन पाटील याने मोबाईल टॉवरच्या एकुण १२ बॅटऱ्या काढून दिल्या. (केसीएन)यावेळी भिकन युवराज पाटील याने आपण स्वतः तसेच धर्मेंद्र पाटील व अकरम अली अशा तिघांनी मिळून मारवड व अमळनेर शिवारात असलेल्या जिओ मोबाईलच्या बॅटऱ्या चोरी केल्याचे सांगीतले. खात्री केल्यानंतर मारवड पो.स्टे. तसेच अमळनेर पो.स्टे. येथे गुन्हे दाखल करण्यात आले.
संशयित आरोपी भिकन पाटील आणि धर्मेद्र फकिरा पाटील या दोघांना तसेच त्यांनी गुन्ह्यात वापरलेले छोटा हत्ती मालवाहतुक वाहन मारवड पो.स्टे.यांना या गुन्ह्यात पुढील तपासकामी ताब्यात देण्यात आले आहे. मुख्य संशयित आरोपी भिकन पूर्वी जिओ मोबाईल टॉवरचा टेक्नीशियन होता. तसेच तो बॅटरी चोरी करतांना त्याच्या यापूर्वीच्या जिओ कंपनीच्या आयकार्डचा वापर करीत होता. (केसीएन)त्यामुळे त्याचेवर कोणी संशय घेत नव्हते. सदर गुन्ह्याची कारवाई पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, चाळीसगाव भागाच्या अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.









