प्रशासनाकडून विशेष उपाययोजनेची गरज
जळगाव (प्रतिनिधी) : उष्णतेच्या लाटेने जळगाव जिल्ह्यात सर्वत्र लाहीलाही होत आहे. सामान्य माणसे स्वतःचा बचाव करत असताना मात्र दुसरीकडे बेसहारा-भिकाऱ्यांचे मात्र जीव धोक्यात आलेले आहेत. गेल्या ४ दिवसांत जळगावच्या शासकीय रुग्णालयात १५ ते १६ बेवारस मृतदेह आढळून आले आहेत. तर जिल्ह्यात गेल्या १० विविध ठिकाणीदेखील अनोळखी मृतदेह मिळून आल्याने खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात बेवारस, भिकारी वर्गातील नागरिक बिना कपड्यांचे, पुरेसे अन्नपाणी न मिळाल्याने कासावीस झालेले दिसून येत आहेत. त्यांच्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष उपाययोजना करण्याची गरज निर्माण झालेली आहे.
अनेक भिकारी हे मार्केट, गावात फिरत आहेत. यंदा पुरेशा पाणपोयादेखील विविध सामाजिक संस्थेच्या वतीने उभारण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे अनेक ठिकाणी दूरदूरपर्यंत पाणी मिळून येत नाही. पाणी न मिळाल्याने तहानलेले जीव कासावीस होत आहेत. त्यामुळे अनोळखी भिकार्यांचे मृत होण्याचे प्रमाण गेल्या ५ दिवसांत जिल्हाभरात सुमारे १८ ते २२ पर्यंत गेलेले आहे. काही ओळख असलेले नागरिक देखील उन्हामुळे मृत्युमुखी पडल्याचे दिसून आले आहे. काही ठिकाणी शेतमजूर, शेतकरी उन्हाची पर्वा न करता काम करीत असल्याने उन्हाचा फटका बसून त्यांना उपचार घ्यावे लागल्याचे चित्र जिल्ह्यात ठिकठिकाणी दिसून येत आहे.
जिल्ह्यात तापमानाचा पारा हा ४४ ते ४६ असल्याने सर्वाधिक हाल हे भिकारी वर्गाचे होत असल्याचे दिसून आले आहे. जळगाव शहरात शामाप्रसाद मुखर्जी उद्यानात शनिवारी तर २ मृतदेह ४० ते ४५ वयोगटातील मिळून आले आहेत. हे ऊन लागून मयत झाले असावे असा प्राथमिक अंदाज आहे. विविध ठिकाणी पुरेसे पाणी ठेवण्यात येणे हि आता पुढील गरज असून सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन उष्णता कमी करण्यासाठी भिकार्यांना मठ्ठा, ताक आदी वाटप करण्याचीदेखील गरज निर्माण झाली आहे.