मुक्ताईनगर येथील तरुणाची फिर्याद
मुक्ताईनगर (प्रतिनिधी) :- जिल्हा दुध संघात नोकरी लावून देण्याच्या आमीषातून तरूणाची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील दुसर्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. यापूर्वी मुख्य सूत्रधाराला अटक करण्यात आली आहे.
मुक्ताईनगर तालुक्यातील भोकरी येथील रहिवासी असलेल्या फकीरा अर्जुन सावकारे ( वय २५) या तरूणाने मुक्ताईनगर पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती. यानुसार, संबंधीत तरूणाने बारावी आणि आयटीआय फिटर हा कोर्स पूर्ण केला आहे. यानंतर त्याची जळगाव येथील प्रमोद शांताराम सावदेकर यांच्याशी ओळख झाली. सावदेकरांनी आपण कृषी उद्योग विकास महामंडळात व्यवस्थापक म्हणून काम करत असल्याचे सांगत आपल्या खूप राजकीय ओळख्या असल्याचे सांगितले. आपण तुला कृषी उद्योग विकास महामंडळ अथवा जिल्हा दुध संघात नोकरी लाऊन देऊ मात्र यासाठी पैसे लागतील असे आमीष त्यांनी दाखविले. यासाठी त्याच्याकडून पैसे घेऊन देखील प्रत्यक्षात मात्र त्याने नोकरी लावून दिली नाही.
या प्रकरणात फकीरा सावकारे यांची सुमारे साडे तेरा लाख रूपयात फसवणूक झाली. या फिर्यादीनुसार मुक्ताईनगर पोलीस स्थानकात प्रमोद शांताराम सावदेकर ( रा. जळगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, याच प्रकरणात आता अमरावती येथून सचिन रमेश वानखेडे याला देखील अटक करण्यात आली आहे. या व्यक्तीने दुध संघातील परिक्षा प्रक्रिया राबविली असून त्याचा या प्रकरणात सहभाग आढळून आल्याने त्याला अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर, या प्रकरणात आता दुसर्या संशयिताला अटक करण्यात आली असून पोलिसांच्या तपासात अजून काही समोर येण्याची शक्यता आहे.