विभागीय सहनिबंधकांच्या निर्णयाला आता हायकोर्टात आव्हान देण्याचाच पर्याय
जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्हा बँक निवडणुकीत उमेदवारी अवैध ठरलेल्या ९ पैकी ८ जणांचे अपील फेटाळले गेले आहेत . विभागीय सहनिबंधकांच्या या निर्णयाला आता हायकोर्टात आव्हान देण्याचाच पर्याय या ८ उमेदवारांसमोर आहे .
जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत २० ऑक्टोबररोजी छाननीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उमेदवारी अवैध ठरवलेल्या उमेदवारांपैकी ९ उमेदवारांनी या निर्णयाविरोधात नाशिकच्या विभागीय सहनिबंधकांकडे अपील दाखल केले होते . माजी आमदार स्मिता वाघ , माजी आमदार संतोष चौधरी , मुक्ताईनगरचे नाना पाटील , दिलीप पाटील, माधुरी अत्तरदे , प्रकाश पाटील , भारती चौधरी व दिगंबर चव्हाण यांचा समावेश आहे .
या ९ उमेदवारांपैकी फक्त महेंद्र सपकाळे यांचे अपील मंजूर करण्यात आले आहे . महेंद्र सपकाळे यांचा अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातील उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अवैध ठरवला होता . महेंद्र सपकाळे भुसावळच्या महात्मा ज्योतिबा फुले हमाल मापाडी कामगार सहकारी संस्थेत कोणत्या कालावधीत कार्यरत होते हे उमेदवारी अर्जात स्पष्ट नमूद नसल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरवला होता मात्र किरकोळ कारणावरून असा निर्णय घेऊ नये आणि व्यापक विचार करून निर्णय घ्यावा अशा राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारावर विभागीय सह निबंधकांनी महेंद्र सपकाळे यांची उमेदवारी वैध ठरवली आहे .