गणपती रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
रुग्णाच्या मृत्यूची चौकशी करण्याची नातेवाईकांची मागणी
जळगाव (प्रतिनिधी) – भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील ऑर्डनन्स फॅक्टरी येथील कर्मचारी व रहिवासी असलेली 45 वर्षीय व्यक्ती करोना बाधित म्हणून गणपती हॉस्पिटलमध्ये गेल्या 14 दिवसांपासून उपचार घेत होती. उपचारादरम्यान त्यांचा गुरूवारी 24 रोजी दुपारी 5 वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. मात्र, हॉस्पिटलचे बिल दिले नसल्यामुळे मयत व्यक्तीचा मृतदेह ताब्यात देण्यास रुग्णालय प्रशासनाने नकार दिला. त्यामुळे शुक्रवारी 25 रोजी रुग्णालयात सकाळी तणाव निर्माण झाला होता. नोडल अधिकारी तथा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण यांनी नातेवाईकांशी संवाद साधल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.
वरणगाव फॅक्टरी येथील एका कर्मचाऱ्याला 20 दिवसांपूर्वी प्रकृती बरी नसल्याने भुसावळ येथील खाजगी दवाखान्यात नेले होते. तेथे करोना टेस्ट करण्यास सांगितले. अहवाल पॉझिटिव्ह आला. त्याला श्वास घ्यायला त्रास होत असल्याने जळगावी उपचार घ्यायला सांगितले.
त्यानुसार कर्मचाऱ्याच्या नातेवाईकांनी शासकीय अधिग्रहित गणपती रुग्णालयात जळगावी उपचारासाठी 11 सप्टेंबर रोजी दाखल केले. तब्बल 14 दिवस रुग्णालयात ठेवल्यावरही रुग्णाच्या प्रकृती विषयी रुग्णालय प्रशासनाने कुठलीच माहिती दिली नाही. मात्र गुरुवारी 24 रोजी दुपारी 4.20 वाजता कर्मचारी मयत झाला अशी माहिती रुग्णालयाने नातेवाईकांना कळविली. त्यामुळे जळगाव शहरात राहणारे नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली. मृत्यू का झाला याचे कुठलेही ठोस कारण रुग्णालय प्रशासनाने दिले नाही. दोन दिवसांपूर्वी रुग्ण चांगला होता , मग त्याचा मृत्यू झाला कसा असा सवाल नातेवाईकांनी विचारला. त्यामुळे रुग्णालयाच्या कारभारावर साशंकता निर्माण झाली. तसेच बिल बाकी आहे असे सांगून मृतदेह देणार नाही अशी भूमिका घेतली. तसेच, संध्याकाळी 6 वाजेनंतर स्मशानभूमीत मृतदेह घेत नाही असे सांगत रुग्णालयाने मृतदेह देण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. रुग्णालयाने 4. 20 वाजता जर नातेवाईकांना मयत झाल्याचा फोन केला तर रुग्णालयाच्या पावतीवर मृत्यूची वेळ 4.55 का लिहिली हा प्रश्न देखील अनुत्तरित आहे.
दरम्यान, दुसऱ्या दिवशी शुक्रवारी 11 वाजता नातेवाईक मृतदेह घेण्यास आले असताना त्यांना 1 लाख 11 हजार बिल बाकी आहे, ते आधी भरा असा निरोप रुग्णालयाने दिला. मात्र आधीच ऑनलाईन 2 लाख 44 हजार तसेच 50 हजार रुपये रोख भरले असल्याने आणखी का द्यावे असे मयताच्या भावाने विचारले. मात्र रुग्णालयाने संशयास्पद असलेले बिल नातेवाईकांना दिले. त्यात 2 लाख 44 हजार व रोख 50 हजार जमा केल्याचा उल्लेख नाही. त्यामुळे नातेवाईकांचा आणखीन संताप झाला. यात औषधी व इंजेक्शन देखील डॉक्टरांना आणून दिले असल्याची माहिती नातेवाईकांनी सांगितली.
यावेळी नोडल अधिकारी तथा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी नातेवाईकांशी संवाद साधला. त्यांनी, घडलेल्या प्रकारविषयी तक्रार अर्ज द्या, रुग्णालयाचे लेखापरीक्षण केले जाईल असे आश्वासन दिले. त्यानंतर मृतदेह उचलण्याचा निर्णय नातेवाईकांनी घेतला. सदर प्रकारचे लेखापरीक्षण, मृत्युपरिक्षण करावे अशी तक्रार जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे केली जाणार असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
दरम्यान, सदर प्रकारची नोडल अधिकारी डॉ.एन.एस.चव्हाण यांच्याकडून माहिती मिळाली आहे. नातेवाईकांची तक्रार आल्यास पुढील चौकशी केली जाईल, अशी माहिती केसरीराजशी बोलताना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली.