जामनेर तालुक्यातील पहूर जवळची घटना
जामनेर (प्रतिनिधी) : शेतीची मशागत करून दुचाकीने घराकडे परतत असताना गणेश नर्सरीजवळ जळगाव- छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर दुचाकीला कारने जबर धडक दिली. यात तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी दिनांक १७ ऑगस्ट रोजी संध्याकाळी घडली. त्यांना पहूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता मृत घोषित करण्यात आले. घटनेची पहूर पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे.
ज्ञानेश्वर ऊर्फ बाळू रामकृष्ण तरवाडे (वय ४३, रा.पहूर पेठ, ता.जामनेर) असे मयत तरुणाचे नाव आहे. ज्ञानेश्वर रामकृष्ण तरवाडे हे दुचाकीवरून शेती काम करण्यासाठी मजुरीला गेले होते. शेतीचे काम आटोपून संध्याकाळी घरी परतताना जळगाव-छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर गणेश नर्सरीजवळ रस्ता ओलांडताना कारने (एमएच१९/इजी४७०१) मागून जबर धडक दिली. यात तरवाडे गंभीर जखमी झाले. माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले.
अपघातग्रस्त वाहनाने ज्ञानेश्वर तरवाडे यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल निकम यांनी तपासणी करून ज्ञानेश्वर तरवाडे यांना मृत घोषित केले. अपघातग्रस्त वाहनाचा चालक इम्रान अलीम पटेल (वय ३१, नांदेड, ता. धरणगाव) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनेची पाहुर पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली असून अधिक तपास पहूर पोलिस करत आहेत.