जळगाव एमआयडीसी पोलिसांची कामगिरी
जळगाव (प्रतिनिधी) :- जामनेर तालुक्यातील शहापूर रस्त्यावर एका व्यापाऱ्याला सुमारे २ लाखांत लुटल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी एका संशयित आरोपीला जळगाव तालुक्यातील कुसुबा येथून अटक केली आहे. त्याच्याकडून गुन्ह्यातील दुचाकी व मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.
निलेश रतन पवार (वय ३६ रा. शहापूर ता. जामनेर) हा व्यापारी रविवारी १८ फेब्रुवारी रोजी सकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास बॅगेतून १ लाख ९३ हजार ५०० रूपयांची रोकड घेवून निघाले होते. जामनेर ते शहापूर रोडवरील बेलफाट्या रस्त्यावर अज्ञात तीन जणांनी त्यांचा रस्ता अडविला. त्यांनी निलेश पवार यांना बेदम मारहाण करून त्यांच्या जवळील रोकड ठेवलेली पिशवी लांबविली होती. हा प्रकार घडल्यानंतर निलेश पाटील यांनी जामनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर लूट ही जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील संशयिताने केली असल्याबाबतची माहीती पोलीस निरीक्षक बबन अव्हाड यांना मिळाली होती.
त्यानुसार कुसुंबा येथून ऋषिकेश रमेश मावळे (रा. साईसिटी कुसुंबा) यांस ताब्यात घेतले होते. त्याची चौकशी करता त्याने सदरचा गुन्हा केल्याचे कबुल करुन गुन्हयातील वापरलेली मोटर सायकल काढून दिली. त्याच्या कडून त्याच्यासोबत असलेल्या इतर दोन साथीदाराचे नाव निष्पन्न केले होते. सदरची कामगिरी पोउपनिरी दत्तात्रय पोटे, दिपक जगदाळे, सफौ अतुल वंजारी, पोना सुधिर साळवे, सचिन पाटील, किशोर पाटील, पोकों राहुल रगडे, विशाल कोळी, ललित नारखेडे, मपोकों राजश्री बाविस्कर यांनी केली. पुढील कारवाई कामी संशयितालाजामनेर पोस्टेच्या ताब्यात देण्यात आले आहे.