जामनेर तालुक्यात सोलर प्लांटमधून तांब्याची डीसी केबल चोरी

७४ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल
जामनेर : जामनेर तालुक्यातील मुंदखेडा-शिवारातील सोलर प्लांटमधून तांब्याची डीसी केबल चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरट्याने सोलर प्लांटमधील केबल कापून नेल्याने सुमारे ७४ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस नोंदीनुसार, मुंदखेडा शिवारातील शेत गट क्रमांक ४४/१ येथे सोलर प्लांट सुरू आहे. दि. २८ जुलै २०२६ रोजी रात्री ९.३० वाजेपासून २९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ७ वाजेपर्यंतच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने सोलर प्लांटमधील डीसी केबल चोरी केली.
चोरट्याने शेतातील सोलर प्लांटमधून तांब्याची तार असलेली डीसी केबल कापून नेल्याचे फिर्यादीत नमूद आहे. चोरीस गेलेल्या केबलची अंदाजे किंमत ७४ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी नोंदवले आहे.
याप्रकरणी संतोष अशोक जावळे (वय ४९, व्यवसाय खासगी नोकरी, रा. प्रभाकर कॉलनी, भुसावळ) यांनी फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४०६/२०२६, भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोउपनि. कृष्णा साळुंखे करीत आहेत








