जामनेर तालुक्यातील सामरोद येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : डोक्यावर झालेल्या कर्जाचा बोजा असह्य झाल्याने एका शेतकऱ्याने राहत्या घरी विष घेतल्याची धक्कादायक घटना शनिवारी दि. ७ सप्टेंबर रोजी रात्री घडली होती. याप्रकरणी उपचारादरम्यान त्यांचा रविवारी दि. ८ रोजी उपचारादरम्यान जळगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला आहे. याप्रकरणी जामनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरु होते.
सुनील तुकाराम गावंडे (वय ५८, रा. सामरोद ता. जामनेर) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, ३ मुले, १ मुलगी, भाऊ असा परिवार आहे. (केसीएन) शेतीकाम करून ते परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. दरम्यान, शनिवारी पहाटे १२ वाजेनंतर त्यांनी घरी विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. कुटुंबियांना समजताच त्यांनी तत्काळ जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी त्यांना पहाटे २ वाजेच्या सुमारास दाखल केले.
रुग्णालयात उपचार सुरु असताना रविवारी दि. ८ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. घटनेची रामानंद नगर पोलीस स्टेशनला प्राथमिक नोंद होऊन जामनेर पोलीस स्टेशनकडे वर्ग करण्यात आली आहे. घटनेप्रकरणी सामरोद गावात शोककळा पसरली आहे. दरम्यान, सुनील गावंडे यांच्यावर कर्ज असल्याने त्या विवंचनेत ते असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.