रेल्वेच्या धडकेत मोबाईल फुटला; सीमकार्डने मिळवून दिला कुटुंबीयांचा पत्ता
जळगाव ( प्रतिनिधी ) :- जळगाव-शिरसोली डाऊन मार्गावर रेल्वे रुळाचे काम करत असताना, अवघ्या आठ दिवसांपूर्वी मध्यप्रदेशातून आलेल्या एका ३० वर्षीय मजूर महिलेचा रेल्वेच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला. पूनम तोळाराम हाके (रा. मदनी, जुनारदेव, जि. सिंदवाडा, म.प्र.) असे मृत महिलेचे नाव आहे. ही थरारक घटना गुरुवारी सायंकाळी इतर मजुरांच्या डोळ्यादेखत घडली.
पूनम ही रेल्वे रुळावरील खडीकरण आणि सपाटीकरणाचे काम करत होती. दरम्यान, लघुशंकेसाठी रेल्वे लाईन ओलांडत असतानाच भरधाव आलेल्या रेल्वेने (क्र. २२५९०) तिला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात तिचा जागीच मृत्यू झाला. पूनम आठ दिवसांपूर्वीच एकटी कामासाठी जळगावात आली असल्याने घटनास्थळी तिचा कोणीही नातेवाईक नव्हता. अपघातात तिचा मोबाईल पूर्णपणे फुटला होता, मात्र पोलिसांनी चलाखी दाखवत मोबाईलमधील सीमकार्ड काढून त्याद्वारे तिच्या वडील आणि भावाशी संपर्क साधला. शुक्रवारी तिचे नातेवाईक जळगावात दाखल झाले असून, शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनानंतर मृतदेह त्यांच्या स्वाधीन करण्यात आला.











