३७ कोटींचा हप्ता जप्त, गुन्हे दाखल होणार : जिल्हाधिकारी घुगे यांची माहिती
जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव जिल्ह्यात हवामान आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत केळीचा विमा लाटण्यासाठी करण्यात आलेला एक मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. प्रत्यक्ष शेतात पीक नसतानाही तब्बल ४४ हजार हेक्टरवर केळीचा विमा उतरवण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून, याप्रकरणी आता प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी याबाबत पत्रकारांना माहिती दिली आहे.

यावर्षी जळगाव जिल्ह्यात सुमारे ९६ हजार १६२ हेक्टर क्षेत्रासाठी शेतकऱ्यांनी केळी पीक विमा काढला होता. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत विमा क्षेत्रात झालेली ३० हजार हेक्टरची वाढ संशयास्पद वाटल्याने कृषी आयुक्तालयाने ‘एमआरसॅक’द्वारे सॅटेलाईट पडताळणीचे आदेश दिले होते. या तपासणीत ४४ हजार ४१ हेक्टर जमिनीवर केळीचे पीकच अस्तित्वात नसल्याचे स्पष्ट झाले आहे. केवळ कागदावरच केळी लावून विमा लाटण्याचा हा ‘रॅकेट’ असल्याचे आता समोर आले आहे.
या बोगस अर्जदारांनी विमा हप्त्यापोटी भरलेले ३७ कोटी ४३ लाख रुपये शासनाने जप्त केले असून, ही रक्कम आता परत मिळणार नाही. तसेच, ज्या खातेदारांनी ४ हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्राचा विमा काढला आहे, त्यांना या योजनेतून अपात्र ठरवण्यात येणार आहे.
कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी याप्रकरणी गंभीर दखल घेतली असून, शासनाची फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. विशेष म्हणजे, मागील वर्षी अपात्र ठरलेल्या अनेक सराईत लाभार्थ्यांनी यंदाही तोच प्रकार केल्याचे उघड झाले आहे.
तपासानुसार धरणगाव, चोपडा आणि रावेर या तालुक्यांमध्ये सर्वाधिक फेरफार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या तालुक्यांमधील संशयास्पद अर्जांची आता सूक्ष्म पातळीवर चौकशी केली जात आहे.
“विमा कंपनी आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. कृषी आयुक्तांशी चर्चा करून या बोगसगिरी करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाईची दिशा ठरवली जाईल.”
— रोहन घुगे, जिल्हाधिकारी, जळगाव









