शासकीय वैद्यकीय महाविद्यालच्या गेटजवळ कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाजवळ बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या २ जणांवर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी दि. २७ जून रोजी रात्री १० वाजता यशस्वी कारवाई केली. या कारवाईत ५०० रुपयांच्या ८ हजार रुपये किमतीच्या बनावट नोटा, एक दुचाकी आणि दोन मोबाईल असा एकूण ३६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी दोघांविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली होती. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मुख्य गेटजवळ दोन संशयित व्यक्ती ५०० रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने सापळा रचला. रात्री १० वाजताच्या सुमारास पोलिसांनी सचिन दरबारसिंग राजपूत (वय ३४, रा. रामेश्वर कॉलनी) आणि सचिन संजय गोसावी (वय २३, रा. वाघ नगर, जळगाव) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ८ हजार रुपये किमतीच्या ५०० रुपयांच्या १६ बनावट नोटा, २ मोबाईल फोन आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी (एमएच १९ डीयू ७८०८) असा एकूण ३६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोहेकॉ विजय पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दोन्ही संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख करत आहेत.