मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदा येथील घटना
मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : अंगणात झोपलेल्या दिव्यांग पानटपरी चालकाच्या गळ्याला चाकू लावत एकाने ११ हजारांची रोकड लूटली. ही घटना तालुक्यातील उचंदा येथे शुक्रवार दिनांक २१ जून रोजी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संदीप समाधान इंगळे (वय ३०, उचंदा ता. मुक्ताईनगर) हे व्यवसायाने पानटपरी चालक असून दिव्यांग आहेत.दिनांक २१ जून रोजी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास घराबाहेर ते झोपले होते तेव्हा संशयीत आरोपी शुभम सुनील इंगळे याने गळ्याला चाकू लावत पँटच्या खिशातील पानटपरीवरील व्यवसायाचा दिवसभराचा गल्ला तसेच नागरिकांकडून भिशीची रक्कम मिळून १० हजार ९०० रुपये लुटून पोबारा केला.
यानंतर घाबरलेल्या दिव्यांग संदीप इंगळे यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. त्यानुसार संशयित आरोपी शुभम इंगळे याच्याविरुद्ध मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप चेडे करीत आहेत.