अधिष्ठात्यांचे दुर्लक्ष कारणीभूत ; रुग्णसेवा वाऱ्यावर

जळगाव (प्रतिनिधी) – गेल्या वर्षभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा झालेला कायापालट आणि शिस्त बिघडत चालली असून याला नवीन अधिष्ठात्यांचे दुर्लक्ष कारणीभूत ठरत आहे. कर्मचाऱ्यांचा बेशिस्तपणा, बेशिस्त पार्किंग, अस्वच्छता हे शासकीय रुग्णालयात पुन्हा एकदा दिसून येत आहे. एकतर्फी पदभार घेतलेले अधिष्ठाता डॉ. मिलिंद फुलपाटील यांनी महाविद्यालय व रुग्णालयात राउंड घेणे बंद केलेले असून रुग्णांना एकप्रकारे वाऱ्यावर सोडून दिलेले आहे. त्यामुळे नातेवाईकांची नाराजी वाढत आहे.

भुसावळ येथील मालती नेहेते मृत्यू प्रकरणानंतर अधिष्ठाता म्हणून डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता. त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या परिसरात कमालीची स्वच्छता कायम ठेवली होती. तसेच, सुशोभीकरणसह सुसज्ज व शिस्तशीर वाहनतळ उभारले होते. यासह डॉक्टर, परिचारिका यांचेसह अधिकारी, कर्मचारी यांचे मनोबल वाढवून त्यांना कामाची शिस्त लावून दिली होती. त्यामुळे राज्यभरात जळगावच्या या रुग्णालयाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दखल घेऊन कौतुक केले. विशेष करून कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत अविरतपणे सर्व घटकांनी डॉ. रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली आदर्श कार्य केले आहे.

आता नागपूर येथील डॉ. मिलिंद फुलपाटील यांनी १३ सप्टेंबर रोजी एकतर्फी पदभार घेतल्यानंतर मात्र या महाविद्यालय व रुग्णालयाची शिस्त बिघडल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत आहे. अनेक वाहनधारक तसेच अधिकारी-कर्मचारी हे बेशिस्तपणे आवारात कोठेही वाहन लावत आहे. वाहनतळात वाहने लावण्याबाबत सुरक्षारक्षक सूचना देऊनही अनेक जण त्यांना जुमानत नाही. रुग्णालयात देखील रुग्णांसाठी सुविधा मिळताना नातेवाईकांना खूप कसरती कराव्या लागत आहे. डॉक्टर्स, परिचारिका, अधिकारी उद्धटपणे बोलतात, व्यवस्थित माहिती सांगत नाही म्हणून नातेवाईक तक्रार करीत आहेत. अस्वच्छता वाढत असून कचरापेटीचा नातेवाईक वापर करताना दिसत नाही. कोठेही कचरा फेकणे, दिसला कोपरा कि थुंकणे असे प्रकार वाढत आहे.

डॉ. जयप्रकाश रामानंद हे दिवसातून एक ते दोन वेळा रुग्णालय व महाविद्यालय परिसरात फिरून राउंड घ्यायचे. रुग्णांशी, नातेवाईकांशी संवाद साधायचे. त्यांचे शंका निरसन व्हायचे. तसेच डॉक्टर्स, परिचारिका, अधिकाऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेत. मात्र आता एकतर्फी पदभार घेतलेले डॉ. मिलिंद फुलपाटील यांनी राउंड घेणे बंद केलेले असून रुग्णांना वाऱ्यावर सोडून दिलेले आहे.
नवीन अधीक्षक आल्यावरही सुधारणा नाही
डॉ. फुलपाटील यांच्या अजब स्वभावामुळे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षकपद स्वीकारायला कोणीही तयार नव्हते. अखेर रोटेशन पद्धतीने औषधवैद्यक शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. भाऊराव नाखले यांची वैद्यकीय अधीक्षकपदी नियुक्ती झाली. डॉ. भाऊराव नाखले यांनी २३ सप्टेंबर रोजी पदभार घेतल्यानंतरही अजून काही सुधारणा झाल्याचे दिसून आलेले नाही. उपचार मिळतील या मोठ्या आशेने सरकारी रुग्णालयात येणाऱ्या नातेवाईक व रुग्णांचे मात्र हाल सुरु झालेले आहे.







