जळगाव (प्रतिनिधी) : शहिद सैनिकांच्या बलिदानाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी राज्यात दि. २६ जुलै रोजी कारगिल विजय दिवस साजरा करण्यात येतो. त्या अनुषंगाने जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जळगांवच्या वतीने जिल्हयात दि. २६ जुलै रोजी सकाळी ११ वाजता माजी सैनिक बहुउद्देशिय सभागृह जळगाव येथे कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात युध्दात शहिद झालेले अधिकारी/जवान यांच्या अवलंबितांचा कारगिल विजय दिवसाचे औचित्य साधुन शॉल व श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. तसेच जवान फाऊंडेशन, जळगांव व रेड प्लस ब्लड बँक तसेच जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. कारगिल विजय दिवस (रौप्य महोत्सव) औचित्य साधुन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी या कार्यक्रमात माजी सैनिक/ कार्यरत सैनिकांसाठी सैनिक कॉलनी, शहिद युध्दस्मारक, सैनिकी शाळा उभा करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
तसेच सैनिकासाठी शिबीर आयोजन तसेच सर्व माजी सैनिक/ कार्यरत सैनिकांची कामे ही वेळेत पुर्ण केली जातील असेही सांगितले. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमाला निवासी उपजिल्हाधिकारी तथा सैनिक कल्याण अधिकारी सोपान कासार, संजय रामराव गायकवाड, सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी जितेंद्र हिंदुराव इमडे, वरिष्ठ लिपीक रतिलाल भूरा महाजन, कैलास वनिलाल लोहार, लिपीक टंकलेखक, ईश्वर मोरे, भरत गायकवाड, शिवराम पाटील, दिपक गुप्ता हे उपस्थित होते.