जळगाव ( प्रतिनिधी ) – अनुसूचित जाती व जमातीच्या अर्जदारांना प्राधान्याने घरगुती वीज जोडणी देण्यासाठी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या पुढाकाराने १४ एप्रिलपासून सुरू करण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनेत जळगाव परिमंडलातील २२१ ग्राहकांना वीजजोडणी देण्यात आली आहे.
येत्या ६ डिसेंबरपर्यत या योजनेचा लाभ घेता येणार असून गरजूनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी वीज जोडणी कार्यक्रम १४ एप्रिल ते ६ डिसेंबर अर्थात बाबासाहेबांची जयंती ते पुण्यतिथी या कालावधीत राबविण्याचा निर्णय घेण्यात आला या योजनेत जळगाव परिमंडलात आजपर्यंत २२१ अर्जदारांना वीजजोडणी देण्यात आलेली आहे. यात जळगाव मंडलात १३२, नंदुरबार मंडलात ४८ तर धुळे मंडलात ४१ ग्राहकांना वीजजोडण्या देण्यात आलेल्या आहेत.
योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी अर्जदाराकडे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जातीचे प्रमाणपत्र, वीज जोडणीसाठी करण्यात येणाऱ्या विहित नमुन्यानुसार आवश्यक कागदपत्रे उदा.आधार कार्ड, रहिवासी दाखला इ. आवश्यक आहे. अर्जदारांनी वीजजोडणीसाठी अर्ज केल्याच्या ठिकाणी यापूर्वीची थकबाकी नसावी. शासनमान्य विद्युत कंत्राटदारांकडून वीज मांडणीचा चाचणी अहवाल अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील. लाभार्थ्यास ५०० रुपये अनामत रक्कम महावितरणकडे एकरकमी अथवा ५ समान मासिक हफ्त्यांमध्ये वीजबिलाद्वारे भरण्याचा पर्याय उपलब्ध आहे. अर्जदाराचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर विद्युत नियामक आयोगाच्या तरतुदीच्या अधीन राहून वीजजोडणी उपलब्ध करण्यात येईल. ज्या अर्जदाराच्या घरी वीज जोडणी नाही अशा लाभार्थ्यांना विद्युत पायाभूत सुविधा उपलब्ध असल्यास पुढील १५ कार्यालयीन दिवसांत वीजजोडणी देण्यात येईल. अर्जदारास वीजजोडणीसाठी विद्युत पायाभूत सुविधा उपलब्ध करावी लागणार असल्यास महावितरणद्वारे स्वनिधी अथवा जिल्हा नियोजन विकास निधी अथवा इतर उपलब्ध होऊ शकणाऱ्या निधीमधून काम प्राधान्याने हाती घेऊन पूर्ण करण्यात येईल व वीजजोडणी देण्यात येईल.