जळगाव (प्रतिनिधी) :- जळगांव, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यांचा समावेश असणाऱ्या महावितरणच्या जळगांव परिमंडलात ऑनलाईन वीजबिल भरण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. सप्टेंबर या एका महिन्यात परिमंडलातून ४ लाख ८१ हजार १३ ग्राहकांनी १०० कोटी ९ लाख रुपयांचा ऑनलाईन वीनबिल भरणा केला आहे. ऑनलाईन ग्राहकांची ही संख्या लघूदाब वर्गवारितील ग्राहकांची आहे.
ऑनलाईन विजबिल भरणा पध्दतीमुळे ग्राहकांना रांगेत उभे राहून अधिकचा वेळ खर्ची घालवण्याची गरज नाही. ऑनलाईन वीजबिल भरणा केल्यामुळे ग्राहकांचा वेळ वाचणार आहे. शिवाय, वीज यंत्रणेवरील वसुलीसाठीचा अतिरिक्त ताणही कमी होणार आहे. ग्राहकांना वीज सेवेबाबतचे एस एम एस देण्यासाठी ग्राहकांच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणीही सुरु असून ग्रामीण भागातल्या वीज ग्राहकांची भाषेची सोय व्हावी म्हणून महावितरणतर्फ़े आता इंग्रजीसह मराठी भाषेतूनही एस एम एस सेवा सुरु आहे. जळगांव जिल्ह्यातून सप्टेंबर महिन्यात ३ लाख १९ हजार १६५ ग्राहकांनी ५९.९७ कोटी रुपयांचा ऑनलाईन विजबिल भरणा केला. धुळे जिल्ह्यातून १ लाख ६ हजार ६७७ ग्राहकांनी २८.५३ कोटी तर नंदूरबार जिल्ह्यातून ५५ हजार १७१ ग्राहकांनी ११ कोटी ५९ लाख रुपयांचा ऑनलाईन भरणा केला. एकूण वीजबिल भरणाऱ्या विज ग्राहकांची संख्या सरासरी ६२. ५८ टक्के इतकी आहे.
आपल्याकडे संगणकावर किंवा महावितरण मोबाईल ॲप व महापॉवरपेच्या मदतीने वीजबिल भरण्याची सोपी पध्दत उपलब्ध आहे. ग्राहकांचा वेळ आणि श्रम वाचावेत, रांगेत तिष्ठत उभे राहाण्याची गरज भासू नये म्हणून महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेत स्थळावर जाऊन ग्राहकांना चालू वीजबिल भरण्याची सुविधा आहे. ऑनलाईन बिल भरल्यास संगणकीकृत पावती ग्राहकाला मिळते. महावितरणचे मोबाईल ऑनलाईन ॲप्लीकेशन मराठी आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध असून ती सेवा चोवीस तास उपलब्ध आहे. त्यामुळे ग्राहकाला आपले वीजबिल केव्हाही आणि कुठूनही भरता येते. अधिकाधिक ग्राहकांनी महावितरणच्या ऑनलाईन सुविधांचा लाभ घ्यावा. असे आवाहन मुख्य अभियंता कैलास हुमणे यांनी केले आहे.