शहरातील खूनसत्रामुळे पोलीस दलापुढे आव्हान कायम
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील कालिका माता मंदिर परिसरातील श्री प्लाझा परिसरात शनिवारी रात्री तरुणाचा धारदार हत्यारांनी वार करून खून करण्यात आला. या प्रकरणांमध्ये ५ संशयित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस दलाकडून त्यांची धरपकड केली जात आहे. दरम्यान पत्नीशी असलेल्या अनैतिक संबंधातून झालेल्या वादात हा खून झाल्याची माहिती फिर्यादीतून समोर आली आहे.
आकाश पंडित भावसार (सोनार वय २७, रा. अशोक नगर, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. त्याच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. ट्रान्सपोर्ट व्यवसाय करून तो परिवाराचा उदरनिर्वाह करत होता.(केसीएन)दरम्यान शनिवार दि. ३ मे रोजी रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास आकाश याची पत्नी पूजा भावसार हिचा मावस भाऊ अजय मंगेश मोरे, चेतन रवींद्र सोनार आणि तीन अनोळखी इसम हे दोन स्कुटी वरती आकाशच्या घरी आले. त्यांनी आकाशबद्दल विचारणा केली तेव्हा पूजा हिने आकाशला फोन करून कुठे आहेस ? असे विचारले. आकाशने “श्री प्लाझा, ए वन भरीत सेंटर जवळ” असे सांगितल्यानंतर संशयित आरोपी अजय मोरे, चेतन सोनार आणि इतर तीन जण हे श्री प्लाझाच्या दिशेने निघून गेले.
त्यानंतर ११ वाजेच्या सुमारास संशयित आरोपींनी श्री प्लाझा परिसरात आकाश भावसार याला घेरून धारदार हत्यारांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. तेव्हा त्याच्यासोबत असलेले शैलेश पाटील आणि वैभव मिस्तरी हे घाबरून गल्लीबोळात पळून गेले.(केसीएन)आकाश हा जीव वाचवण्यासाठी रस्त्याच्या पलीकडे पळत गेला. त्यावेळेला मारेकर्यांनी त्याचा पाठलाग करून त्याला पुन्हा धारदार हत्यारांनी गंभीर जखमी केले आणि पळून गेले. यानंतर कुणाल सोनार यांच्या मदतीने आकाश भावसार याला उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले तेथे वैद्यकीय पथकाने तपासून मयत घोषित केले.
याबाबत आकाश भावसार याची आई कोकिळाबाई पंडित भावसार (वय ५४) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शनिपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी अजय मंगेश मोरे हा आकाश भावसार सोनार यांच्या घरी अधून मधून येत होता. त्याचे आकाश याची पत्नी पूजा हिच्या सोबत अनैतिक संबंध होते. या कारणावरून आकाश सोबत अजय याचे वादविवाद झालेले आहेत. त्यामुळे अजय मोरे यानी सूडबुद्धीने त्याच्या साथीदारांसह मिळून त्याला जीवे ठार मारले, अशी फिर्याद कोकिळाबाई भावसार यांनी दिलेली आहे. त्यावरून गुन्हा दाखल झाला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सफोनी साजिद मंसूरी हे करीत आहेत. तसेच आकाश याला चार दिवसांपूर्वी मारेकऱ्यांनी जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती, अशीही माहिती रुग्णालयात आकाशच्या बहिणीने दिली आहे.